बनगरवाडीतील मुख्य रस्ताच बनलाय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:38 IST2021-03-26T04:38:40+5:302021-03-26T04:38:40+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडी गावातील मुख्य रस्त्यावरच असंख्य मोठमोठे खड्डे पडून, रस्ता पूर्णपणे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. खड्डेमय ...

बनगरवाडीतील मुख्य रस्ताच बनलाय धोकादायक
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडी गावातील मुख्य रस्त्यावरच असंख्य मोठमोठे खड्डे पडून, रस्ता पूर्णपणे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. खड्डेमय रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, येथील ग्रामस्थांना दळणवळण करण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता असून, वरकुटे-मलवडी ते म्हसवड या मुख्य रस्त्याला जोडणारा एकमेव मार्ग आहे. यामुळे या रस्त्यावर अधिक प्रमाणात वाहनांची ये-जा असल्याने, तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
बनगरवाडी गावच्या पश्चिमेला अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जांभुळणी हद्दीतील डोंगरावरील भोजलिंग देवस्थान आहे. बनगरवाडीतून येणारा थेट रस्ता डोंगरपायथ्याशी जोडला असल्याने प्रत्येक रविवार, पौर्णिमा, अमावास्येला येणाऱ्या हजारो भाविकांना या खड्डेमय रस्त्याने जाताना कमालीची कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायत कार्यालय ते महादेव मंदिर हा दोन किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यासंबंधी गावकऱ्यांनी अनेकदा संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. वेळोवेळी कागदपत्रांचा पाठपुरावाही केला आहे. तरीही हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच राहिला आहे. अनेकदा या रस्त्यावर छोट्या-मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. दुर्दैवाने एखादी मोठी अपघाती घटना घडल्यास जबाबदार कोण? दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित विभागाचे डोळे उघडणार का? याबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तरी सोयीस्कर प्रवासाच्या दृष्टिकोनातून ताबडतोब उपयोजना करून हा प्रश्न मार्गी लावून रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिक, भाविक-भक्त आणि प्रवाशांकडून केली जात आहे.
(कोट )
माण तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या सर्वच नेत्यांनी हा रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणूक झाल्यापासून अद्यापपर्यंत एकही नेता बनगरवाडी गावाकडे फिरकलेला नाही.
- विक्रम शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते, बनगरवाडी
25वरकुटे मलवडी
बनगरवाडी गावातील मुख्य रस्त्यावरच असंख्य मोठमोठे खड्डे पडून, रस्ता पूर्णपणे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. (छाया : सिद्धार्थ सरतापे)