पाटण पंचायत समितीत महाविकास आघाडीचे प्रथमच दर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:42+5:302021-09-12T04:44:42+5:30
अरुण पवार पाटण : सध्या पाटण पंचायत समिती माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली काम पाहते. मात्र काही दिवसांपूर्वी ...

पाटण पंचायत समितीत महाविकास आघाडीचे प्रथमच दर्शन!
अरुण पवार
पाटण : सध्या पाटण पंचायत समिती माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली काम पाहते. मात्र काही दिवसांपूर्वी एका शासन निर्णयामुळे तालुक्याचे आमदार म्हणून शंभूराज देसाई यांनी एका कार्यक्रमानिमित्त पाटण पंचायत समितीच्या नवीन इमारतीत पहिल्यांदा पाऊल टाकले आणि पाटण पंचायत समितीच्या कारभाराचे तोंडभरून कौतुक केले. या सर्व घडामोडीत थोडावेळ का होईना पाटणला महाविकास आघाडीचे दर्शन जनतेला पाहावयास मिळाले. यामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पाटण पंचायत समितीची सत्ता मिळवण्यासाठी कांटे की टक्कर अशी लढत नेहमीच पाटणकर आणि देसाई गटात बघावयास मिळते. सध्या पाटण पंचायत समितीत पाटणकर गटाचे आठ, तर देसाई गटाचे सहा सदस्य आहेत. सभापती म्हणून पाटणकर गटाचे राजाभाऊ शेलार आणि उपसभापती प्रतापराव देसाई हे काम पाहात आहेत.
महाआवास अभियान योजनेमध्ये पाटण पंचायत समितीने सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला, तर राज्यस्तरीय स्पर्धेतही नाव कमावले.
यानिमित्ताने शासन निर्णयाप्रमाणे तालुक्याचे आमदार यांच्या हस्ते संबंधित पंचायत समिती यांनी कार्यक्रम घ्यावा आणि पुरस्कार वाटप करावे, असा नियम होता.
त्यामुळे पाटण पंचायत समितीची गोची झाली आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना निमंत्रण द्यावे लागले. पाटणकर गटाच्या ताब्यात असलेल्या पाटण पंचायत समितीच्या कार्यक्रमाला मंत्री शंभूराज देसाई कसे, याबाबतची चर्चा सुरू झाली.
अनेकवेळा पाटण पंचायत समितीची सत्ता हस्तगत करण्यात पाटणकर गटाला यश आले आहे. आजही पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत मंत्री देसाई यांचे सदस्य आणि पाटणकर गटाचे सदस्य नेहमीच राजकीय श्रेयवादावरून एकमेकांविरुद्ध खडाजंगी करतात.
राज्यात महाविकास आघाडी झाली; परंतु अजूनही पाटणला म्हणावी तितकी रुजलेली नाही. शरद पवार यांचे कट्टर समर्थक, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र सत्यजित पाटणकर विरुद्ध गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आजही एकमेकांविरुद्ध तिरकस भूमिका असल्याचे जाणवते.
कोट..
पाटण पंचायत समितीने महाआवास योजनेमध्ये पुरस्कार मिळवला त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमास शासन निर्णयाप्रमाणे तालुक्याचे आमदार यांना निमंत्रण होते. त्यानुसार कार्यक्रम पार पडला. त्यामुळे यामध्ये कोणताही राजकीय संदर्भ नव्हता.
- राजाभाऊ शेलार,
सभापती, पाटण पंचायत समिती
फोटो आहे..
११पाटण