पाटण नगर पंचायतीत महाविकास आघाडी की पारंपरिक लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:01+5:302021-09-05T04:44:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रामापूर : जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या पाटण नगर ...

Mahavikas Aghadi or traditional struggle in Patan Nagar Panchayat | पाटण नगर पंचायतीत महाविकास आघाडी की पारंपरिक लढत

पाटण नगर पंचायतीत महाविकास आघाडी की पारंपरिक लढत

लोकमत न्यूज नेटवर्क

रामापूर : जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या पाटण नगर पंचायत निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. पाटण नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले मोर्चेबांधणीसाठी तयारी करत आहेत. आता नगरसेवक असलेले आपल्या प्रभागामध्ये केलेली कामे सांगून आपली उमेदवारी सक्षम कशी राहील, या दृष्टीकोनातून कामाला लागले आहेत. तर काही नवीन इच्छुक उमेदवार हे जवळपासच्या दोन प्रभागांच्या आरक्षणावर नजर ठेवून आहेत. त्यामुळे होणारी निवडणूक ही रंगतदार होणार असून, पाटण नगर पंचायतीच्या निवडणुकीत यावेळी जोरदार घमासान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पाटणसारख्या तालुक्याच्या ठिकाणी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाटण तालुक्याचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली २०१६मध्ये पाटण नगर पंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या मैत्रीपूर्ण झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने निर्विवाद सत्ता मिळवली. या मैत्रीपूर्ण झालेल्या निवडणुकीचा फायदा विरोधकांना मिळाला. या निवडणुकीत भाजप १ तर शिवसेना २ अशा फक्त ३ ठिकाणीच विरोधकांना आपला करिष्मा दाखवता आला. अन्य ठिकाणी १४ जागांवर राष्टवादीचे उमेदवार विजयी झाले. या झालेल्या निवडणुकीत पाटण नगर पंचायतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून सुषमा महाजन यांना तर उपाध्यक्ष म्हणून दीपक शिंदे यांना काम करण्याची संधी मिळाली.

मागील पाच वर्षांच्या काळात राष्टवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण शहरात नवनवीन विकासाच्या संकल्पना राबविण्याचा नगरसेवक, नगरसेविकांनी सचोटीने प्रयत्न केला. त्यात नियोजनबध्द विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले. त्याला काही प्रमाणात यशदेखील आले. त्यात शहरातील मुख्य चौकात मोठे हायमास्टचे दिवे बसवणे, शहरातील कचरा विघटन प्रकल्प अशा प्रकल्पांना गती दिली. याबरोबरच अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली तर शहरातील १७ प्रभागांमध्ये नागरिकांच्या सोईसाठी पाच वर्षांत जवळपास १० कोटींची विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यात आरोग्य, रस्ते, स्वच्छता, पाणी अशी कामे केलीत.

कोरोनाच्या काळात सर्वच नगरसेवकांनी आपली जबाबदारी पार पाडत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचे सचोटीने प्रयत्न केले. तर पूरपरिस्थितीत जीवाची पर्वा न करता काही नगरसेवकांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

पाटण नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकीत विद्यमान नगरसेवक आणि नवीन इच्छुक, गतवेळच्या निवडणुकीत काही मतांनी पराभूत झालेले उमेदवार यांचा विचार करता उमेदवार ठरविण्यासाठीची मोठी कसरत पाटणकर गटाला करावी लागणार आहे. तर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते कोणती भूमिका घेतात, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे पाटण नगर पंचायतीमध्येदेखील महाआघाडी होणार का, हेदेखील पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. पाटण तालुक्यातील कोणतीही निवडणूक ही दोन तुल्यबळ गटात आणि पक्षातच होणार, हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, पाटण नगर पंचायतीची निवडणूक रंगतदार होणार, हे नक्की.

महत्त्वाचे मुद्दे

पाटण नगर पंचायत मतदान एकूण - ९,६९२

पुरूष - ४,८२१

महिला - ४,८७१

पाटण नगर पंचायत एकूण प्रभाग - १७

सध्याचे पक्षीय बलाबल -

राष्टवादी १४ स्वीकृत ०२ एकूण १६

भाजप - १

शिवसेना - २

Web Title: Mahavikas Aghadi or traditional struggle in Patan Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.