महाराष्ट्राचा विजयी चौकार
By Admin | Updated: April 27, 2015 00:16 IST2015-04-26T23:29:29+5:302015-04-27T00:16:37+5:30
राष्ट्रीय खो-खो स्पर्धा : चारही गटात मिळविले विजेतेपद

महाराष्ट्राचा विजयी चौकार
सांगली (वसंतदादा पाटील क्रीडानगरी) : राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील किशोर, किशोरी, पुरूष व महिला अशा चारही गटांवर आपले वर्चस्व राखत महाराष्ट्राने ‘रेकॉर्ड बे्रक’ विजयाची नोंद केली. चारही गटात विजेतेपद पटकावून महाराष्ट्राने देशभर आपला दबदबा कायम राखला. या यशानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी स्पर्धास्थळी विजयोत्सव साजरा करीत जोरदार आतषबाजी आणि जल्लोष केला.सर्व सामने विद्युतझोतात मॅटवर झाले. सामने पाहण्यासाठी स्पर्धास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांनी कुपवाडनगरी दुमदुमून गेली. शिवप्रेमी मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली होती. किशोर गटातील विजेतेपदासाठी महाराष्ट्र विरूध्द तेलंगणा अशी लढत झाली. महाराष्ट्राचा प्रशांत वाघ, काशिलिंग हिरेकुर्ब व अथर्व वालेने वेगवान खेळ करून तेलंगणाला पराभवाचा धक्का दिला. किशोरी गटात महाराष्ट्र विरूध्द कर्नाटक अशी अंतिम लढत झाली. अनुभवी कर्नाटकला पराभूत करणे सोपे काम नव्हते. कर्नाटकने चिवट खेळ करून महाराष्ट्राला चांगलेच झुंजवले. चपळ महाराष्ट्र संघाने शेवटच्या टप्प्यात आक्रमक खेळ करून कर्नाटकला खिळखिळे केले आणि विजय मिळवला. पुरूष गटात महाराष्ट्र विरूध्द कोल्हापूर यांच्यात अटीतटीचा मुकाबला झाला. संस्थानकाळापासून खो-खोमध्ये स्वतंत्र दर्जा अबाधित राखलेल्या कोल्हापूरने चिवट खेळी केली. दोन्ही संघात मध्यंतरानंतर बरोबरी झाली. केवळ एका गुणाने महाराष्ट्राने हा सामना जिंकला.
महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटकला नमवून विजेतेपद आपल्या नावे केले. बक्षीस वितरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मदन पाटील होते. विजय कडणे व हणमंत सरगर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी मनपा आयुक्त अजिज कारचे, सुरेश शर्मा, प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, नगरसेवक गजानन मगदूम, दीपक सूर्यवंशी, किशोर जामदार, विठ्ठल पाटील, डॉ. प्रशांत इनामदार, डॉ. सुहास व्हटकर, देवेंद्र पाटील, राहुल सोलापुरे आदी उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या नियम पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी झाले. (क्रीडा प्रतिनिधी)
किशोर गट :
महाराष्ट्र (प्रथम)
तेलंगणा (द्वितीय)
कोल्हापूर (तृतीय)
पश्चिम बंगाल (चतुर्थ)
किशोरी गट :
महाराष्ट्र (प्रथम)
कर्नाटक (द्वितीय)
गुजरात (तृतीय)
पश्चिम बंगाल (चतुर्थ)
पुरूष गट :
महाराष्ट्र (प्रथम)
कोल्हापूर (द्वितीय)
आंध्र प्रदेश (तृतीय)
पश्चिम बंगाल (चतुर्थ)
महिला गट :
महाराष्ट्र (प्रथम)
कर्नाटक (द्वितीय)
केरळ (तृतीय)
पश्चिम बंगाल (चतुर्थ)