महाराष्ट्रात युवकांना रोजगाराची मोठी संधी
By Admin | Updated: October 8, 2015 21:49 IST2015-10-08T21:49:34+5:302015-10-08T21:49:34+5:30
सुभाष देसाई : मास औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्रात युवकांना रोजगाराची मोठी संधी
सातारा : ‘परदेशी कंपन्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. काही परदेशी कंपन्या महाराष्ट्रात येणार असून, मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत,’ असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी साताऱ्यात व्यक्त केला. येथील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ सातारातर्फे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार प्रभाकर घार्गे, लघुउद्योग संस्थेचे संचालक आर.बी. गुप्ता, मासचे अध्यक्ष दिलीप उटकूर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, नितीन बानुगडे-पाटील, जे. डी. महाजन, एस. के. कुलकर्णी आदी उपस्थित होते.सातारा हे उद्योगांसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगून देसाई म्हणाले, ‘उद्योजकांसाठी साताऱ्यात मोठी संधी आहे. येथील जमीनमालक उद्योगांसाठी जमिनी देण्यास तयार असून, येथे पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उद्योग क्षेत्रात लघुउद्योगाला फार महत्त्वाचे स्थान आहे.’लघू उद्योगांपासून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे, असे सांगून देसाई म्हणाले, ‘हा लघू उद्योग देशात तसेच राज्यात विखुरलेला आहे. मोठा उद्योग आपल्या जिल्ह्यात आला तर लघू उद्योगांनाही मोठी संधी उपलब्ध होते. येथील जिल्हा उद्योग केंद्रात सूक्ष्म, लघू उद्योगांसाठी आॅनलाईन नोंदणीची सेवा सुरू केली आहे. याचा जास्तीत जास्त सूक्ष्म व लघू उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.यावेळी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘सातारा एमआयडीसी १९७०-७१ सालची आहे. या सातारा एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध नाही, ही उद्योगांसाठी अडचणीची बाब ठरणार आहे. यासाठी पुसेगाव, गोपूज येथील एमआयडीसीचे प्रस्ताव मार्गी लावावेत. तसेच एमआयडीसीसाठी खास अग्निशामक दलाची व्यवस्था करावी व पोलीस ठाण्याचा प्रश्नही मार्गी लावावा.यावेळी लघुउद्योग संस्थेचे संचालक आर. बी. गुप्ता, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, एस. के. कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मास भवन येथील औद्योगिक प्रदर्शन -२०१५ चे उद्घाटन स्टॉलची फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ‘मास’चे अध्यक्ष दिलीप उटकूर यांनी केले. अजित बारटक्के यांनी आभार मानले.
यावेळी उद्योजक, स्टॉलधारक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बंद उद्योगांच्या भूखंडांवर शासनाचा ताबा
एमआयडीसी क्षेत्रातील भूखंड उद्योजकांना देण्यात आले आहेत. कित्येक वर्षे झाले तरी काही उद्योजकांनी घेतलेल्या भूखंडांवर उद्योग सुरू केले नाहीत, अशा उद्योजकांना नोटिसा देऊन भूखंड ताब्यात घेण्याचे काम सुरू असून, आत्तापर्यंत असे १ हजार ७०० भूखंड शासनाने परत घेतलेले आहेत.