महादरेचे जंगल लवकरच फुलपाखरू संवर्धन राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:09+5:302021-02-05T09:19:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बिबट्या, गवे, रानडुकरे, मोर, गरुड, आदी पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असलेले, सातारा शहराच्या हद्दीवर असलेल्या ...

महादरेचे जंगल लवकरच फुलपाखरू संवर्धन राखीव
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : बिबट्या, गवे, रानडुकरे, मोर, गरुड, आदी पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असलेले, सातारा शहराच्या हद्दीवर असलेल्या महादरेच्या जंगलाला फुलपाखरू संवर्धन राखीवचा दर्जा मिळणार आहे. किर्रर्र जंगलात पक्ष्यांच्या किलबिलाटात निसरड्या पायवाटा तुडवत जंगल भ्रमंती अनुभवण्याची संधी निसर्ग पर्यटकांना यानिमित्ताने चालून आली आहे. त्याचबरोबर स्थानिकांना गावातच रोजगाराचे साधनही उपलब्ध होणार आहे.
कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेट बेन यांनी या अनुषंगाने वनभवनात अधिकारी व निवडक नागरिकांची बैठक घेऊन महादरे फुलपाखरू संवर्धन राखीवचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.
पश्चिम घाट आणि पूर्वेकडील दख्खनचे पठार यांना सांधणारा प्रदेश म्हणून महादरेच्या जंगलाची ओळख आहे. त्यामुळे महादरेमध्ये पश्चिम घाट व दख्खनच्या पठारातील दोन्ही प्रकारच्या जैवविविधता यांचा मिलाफ पाहायला मिळतो.
माजी मानद वन्यजीवरक्षक व फुलपाखरांचे अभ्यासक सुनील भोईटे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘पश्चिम घाटात ३६० प्रजातींची फुलपाखरे आढळतात. त्यापैकी १६० प्रजाती एकट्या महादरेमध्ये पाहायला मिळतात. यातील ऑर्किड टिट आणि व्हाईट टिप्ड लाईन ब्ल्यू ही दोन फुलपाखरू परिशिष्ट १ (शेड्युल १) मध्ये गणली जातात. वाघाचा परिशिष्ट १ मध्ये समावेश आहे. ही दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरं वाघाच्या पंगतीत जाऊन बसली आहेत. प्राधान्यक्रमाने ज्या वनस्पती अगर वन्यजीव जपण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी विविध परिशिष्टांची रचना करण्यात आली आहे. एक प्रकारे त्यांना संरक्षित दर्जा देण्यात आला. परिशिष्ट एकमधील २ व परिशिष्ट तीन व चार मधील १६ फुलपाखरं एकट्या महादरेत आढळतात.
जैवविविधतेच्या अंगाने महादरेसारख्या प्रदेशास प्रेशर झोन किंवा दबावक्षेत्र असेही संबोधले जाते. वेगवेगळे अधिवास एकत्र नांदत असताना त्याचा दबाव या क्षेत्रावर असतो. हा दबाव सहन करण्याची क्षमता त्या जागेवर असते. त्यामुळे ती जागा पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजली जाते. मानवी हस्तक्षेप झाल्यास तेथील जैवविविधता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे महादरेच्या जंगलाला पर्यावरणीयदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. तेथील वन्यजिवांसह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या राखीव क्षेत्राला संवर्धन राखीवचा दर्जा देण्याची गरज पुढे आली. या दर्जामुळे संवर्धनाच्या कामांसाठी शासनाचा निधी उपलब्ध होईल. त्यामुळे अधिक परिणामकारक कामे होतील.
चौकट ....
येवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यंत सुमारे १०७ हेक्टर वनक्षेत्रावर वनविभागाची मालकी आहे. एवढ्याच क्षेत्राला संवर्धित राखीव क्षेत्राचा दर्जा असेल. त्यात खासगी जमिनीचा समावेश नाही. या दर्जामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या कोणत्याही हक्काला बाधा नाही. त्यामुळे विस्थापन, पुनर्वसन असे कोणतेही प्रश्न उद्भवत नसल्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी स्पष्ट केले.
कोट ...
दहा वर्षांचा व्यवस्थापन आराखडा केला जाईल. अधिवास विकास, पाणवठा व कुरण विकासाची कामे होतील. माहिती केंद्र, निरीक्षण मनोरे यांची उभारणी, निसर्गवाटांचा विकास करून निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल. ग्रामस्थांच्या सहभागातून व्यवस्थापन समिती काम पाहील. स्थानिकांच्या रोजगाराला संधी निर्माण होईल.
- डॉ. व्ही. क्लेमेट बेन
मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर
फोटो मेलवर पाठविला आहे