सातारा वनक्षेत्रातील महादरे जंगल बहुरंगी फुलपाखरांसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 09:35 PM2021-02-02T21:35:06+5:302021-02-02T21:35:47+5:30

Forest Department Satara Butterflay- सातारा वनविभागातील महादरे येथील जंगलाला 'फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्रा'चा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.  भारतामध्ये प्रथमच बहुरंगी फुलपाखरांसाठी एखादे वनक्षेत्र राखीव करुन त्याला संरक्षण देण्याचे काम महाराष्ट्र वन विभागाकडून केले जात आहे.

Mahadare forest in Satara forest area has the status of 'Butterfly Conservation Reserve' | सातारा वनक्षेत्रातील महादरे जंगल बहुरंगी फुलपाखरांसाठी राखीव

सातारा वनक्षेत्रातील महादरे जंगल बहुरंगी फुलपाखरांसाठी राखीव

Next

सातारा  - सातारा वनविभागातील महादरे येथील जंगलाला 'फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्रा'चा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.  भारतामध्ये प्रथमच बहुरंगी फुलपाखरांसाठी एखादे वनक्षेत्र राखीव करुन त्याला संरक्षण देण्याचे काम महाराष्ट्र वन विभागाकडून केले जात आहे.
 
 'राज्य वन्यजीव मंडळा'ने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सातारा वनक्षेत्रातील दोन जंगलांना 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा दिला. यामध्ये सह्याद्रीचे उत्तरेकडील जोर-जांभळीचे जंगल आणि पक्षी अधिवासाकरिता महत्त्वाच्या असणाऱ्या 'मायणी' वन आणि पाणथळ क्षेत्रांचा समावेश होता.

आता सातारा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या महादरे येथील राखीव वनक्षेत्र 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह' म्हणून प्रस्तावित करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन आणि साताऱ्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी महादरे येथील निवडक नागरिकांसोबत याविषयी बैठक घेतली.

हे वनक्षेत्र फुलपाखरांच्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असल्याने त्याला 'महादरे फुलपाखरू कॉन्झर्वेशन रिझर्व्ह' म्हणून नावारुपास आणण्यात येत आहे. त्यामुळे फुलपाखरांच्या संवर्धनासाठी देशात प्रथमच एखादे वनक्षेत्र राखीव करण्याचा प्रयत्न सातारा वन विभागाने केला आहे.
 

१०७ हेक्टर क्षेत्रावर पसरला महादरेचा वनपट्टा

पश्चिम घाट आणि दख्खन पठाराचा पूर्वेकडील भाग यांना जोडणारा महादरेचा वनपट्टा आहे. येवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यत १०७ हेक्टर क्षेत्रावर हा वनपट्टा पसरलेला आहे. पश्चिम घाटामध्ये फुलपाखरांच्या साधारण ३४७ प्रजाती आढळतात. त्यापैकी महादरेच्या जंगलात १७८ प्रजाती दिसत असल्याची माहिती साताऱ्याचे माजी मानद वन्यजीवरक्षक आणि फुलपाखरू अभ्यासक सुनील भोईटे यांनी दिली.


'महादरे फुलपाखरू कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे भारतात प्रथमच फुलपाखरांच्या संवर्धनासाठी एखाद्या वनक्षेत्राला 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा देण्यात येत आहे.
- डॉ. व्ही. क्लेमेंट बेन,
मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर


 'महादरे फुलपाखरू कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'करिता प्रस्तावित करण्यात आलेला १०७ हेक्टर परिसर हा वन विभागाच्या मालकीचा आहे. यामध्ये कोणत्याही खाजगी मालकीच्या जमिनीचा समावेश करण्यात येणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या हक्कावर गदा येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- डॉ. भारतसिंह हाडा,
उपवनसंरक्षक, सातारा

 'आॅर्किड टिट' आणि 'व्हाईट टिप्ड लाईन ब्लू' या दोन फुलपाखरांना 'वन्यजीव संरक्षण कायद्या'च्या प्रथम श्रेणीचे संरक्षण मिळाले आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीत संरक्षित असलेल्या एकूण १६ फुलपाखरांचा आढळ या परिसरात आहे.  
-सुनील भोईटे, 
फुलपाखरू अभ्यासक.

Web Title: Mahadare forest in Satara forest area has the status of 'Butterfly Conservation Reserve'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.