महाबळेश्वर : फलक हटविल्याने तणाव !
By Admin | Updated: November 17, 2014 23:22 IST2014-11-17T22:58:59+5:302014-11-17T23:22:59+5:30
कंपनीच्या फलकाची होळी : महाबळेश्वरात सफाई कर्मचाऱ्यास मारहाण

महाबळेश्वर : फलक हटविल्याने तणाव !
महाबळेश्वर : खासगी कंपनीच्या जाहिरात फलकावर लावलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारा फलक हटविल्याने महाबळेश्वरात तणाव निर्माण झाला. कंपनीच्या कर्मचाऱ्यास शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली; तसेच पालिकेवर मोर्चा काढला.
शिवसेनाप्रमुखांचा आज, सोमवारी स्मृतिदिन होता. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करणारे फलक शहरात सर्वत्र लावण्यात आले होते. पंचायत समितीसमोरील चौकातही असाच मोठा फलक लावण्यात आला होता. दरम्यान, या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम एका खासगी कंपनीला जाहिरात करण्याच्या मोबदल्यात देण्यात आले होते. ठेकेदाराने या कंपनीचे जाहिरातफलक चौकात लावले होते. त्याच फलकावर शिवसेनेचा फलक लावल्याचे दिसताच ठेकेदाराने सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तेथे पाठविले व शिवसेनेचा फलक उतरविण्यास सांगितले.
कर्मचाऱ्यांनी हा फलक काढला; मात्र काढताना फलकाचे थोडे नुकसान झाले. त्याच वेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील साळुंखे त्या ठिकाणी आले व फलक होता तेथे लावण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्यास नकार दिला. साळुंखे यांनी हा प्रकार उपजिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, तालुकाप्रमुख यशवंत घाडगे, शहरप्रमुख विजय नायडू यांना सांगितला. या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांसह चौकात धाव घेतली. त्यावेळी कर्मचारी सफाई करताना त्यांना दिसले. शिवसेनेचा फलक रस्त्यावर पडल्याचे दिसताच शिवसैनिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आणि त्यास पोलिसांच्या हवाली करून तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते.
त्यानंतर शिवसैनिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. या चौकाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
पालिका गटनेते संदीप साळुंके यांनी फलक काढण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे सांगून निषेध नोंदविला. नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनीही या प्रकाराचा निषेध केला. बैठकीला उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, प्रकाश पाटील, नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर, दत्तात्रय वाडकर, मनोज ताथवडेकर, रमेश शिंदे, शंकर ढेबे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
मार्चमध्येच संपलाय ठेका !
जाहिरातीचा ठेका पालिकेने कोणाला, केव्हा दिला, याची माहिती घेण्यासाठी शिवसैनिकांनी पालिका सभागृहात नगराध्यक्ष, नगरसेवकांशी चर्चा केली, तेव्हा जाहिरात ठेक्याची मुदत मार्च २०१४ मध्येच संपुष्टात आल्याची माहिती उघड झाली. ठेका संपल्यानंतरही जाहिरात केल्याबद्दल ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व पालिकेचे नुकसान भरून घ्यावे, अशी मागणी नायडू, कुंभारदरे यांनी केली.