गणपूर्तीअभावी महाबळेश्वर पालिकेची सभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:58+5:302021-04-01T04:40:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : ‘व्हिप वाॅर’मुळे गाजलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे गणपूर्तीअभावी सभा अखेर तहकूब करण्यात ...

गणपूर्तीअभावी महाबळेश्वर पालिकेची सभा तहकूब
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : ‘व्हिप वाॅर’मुळे गाजलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे गणपूर्तीअभावी सभा अखेर तहकूब करण्यात आली. नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या राजकीय डावपेचांमुळे विरोधकांची खेळी विरोधकांवर उलटल्याची चर्चा आता गावात सुरू झाली आहे.
दरम्यान, रद्द झालेली सभा गणपूर्तीशिवाय घेऊन या सभेत सर्व विषय मंजूर करण्याची तयारी सत्ताधारी गटाने सुरू केल्याने तेलही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. पालिकेत तीन आघाड्या आहेत. यांपैकी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली होती; तर शिवसेनेचे पाच नगरसेवक विरोधात होते; परंतु या चार वर्षांत पालिकेत मोठी राजकीय उलथापालथ झाली. सध्या सत्ताधारी व विरोधी आघाड्यांमध्ये फूट पडली आहे. सध्या राष्ट्रवादी भाजप व शिवसेनेचे काही नगरसेवक एकत्र आले आहेत. या सर्वांचे नेतृत्व सध्या आमदार मकरंद पाटील हे करीत आहेत. पालिकेत भाजपच्या नगराध्यक्षा असून त्यांनी राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांची त्यांना साथ आहे.
आजच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी एका आघाडीचे पक्षप्रतोद असलेले नगरसेवक कुमार शिंदे यांनी आघाडीतील नगरसेवकांना सभेसाठी व्हिप जारी केला म्हणून नगरसेवक संदीप साळुंखे यांनीही आपल्या आघाडीतील नगरसेवकांना व्हिप बजावला. आता गंमत अशी आहे की, कुमार शिंदे यांच्या आघाडीतील काही नगरसेवक विरोधात गेले आहेत; तर विरोधी गटातील संदीप साळुंखे यांच्या आघाडीतील काही नगरसेवक हे सत्ताधारी गटात आहेत. त्यामुळे व्हिपचे करायचे काय? याबाबत गेल्या चार दिवसांपासून महाबळेश्वरचे राजकारण ढवळून निघाले आहे.