महाबळेश्वरात पर्यटकांसाठी ‘डॉल्बी बंदी’चा एल्गार!

By Admin | Updated: June 5, 2015 00:16 IST2015-06-04T23:06:49+5:302015-06-05T00:16:06+5:30

उज्ज्वला तोष्णिवाल : पर्यावरणाच्या रक्षणासाठी लवकरच बैठका

Mahabaleshwar 'Dolby ban' Elgar for tourists! | महाबळेश्वरात पर्यटकांसाठी ‘डॉल्बी बंदी’चा एल्गार!

महाबळेश्वरात पर्यटकांसाठी ‘डॉल्बी बंदी’चा एल्गार!

सातारा : महाबळेश्वर तालुक्याचा समावेश ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये होतो. शहरालगत असलेल्या घनदाट जंगलात अनेक प्राणी वास्तव्यास आहेत. त्यामुळेच महाबळेश्वरचा पर्यटन व्यावसाय बहरला. मात्र, उत्सवात वाजविल्या जात असलेल्या कर्णकर्कश डॉल्बीमुळे प्राणीजीवन विचलित होते. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचतो. तसेच येथे जगभरातून येणारे पर्यटकही विचलित होत असतात. यासंदर्भात ‘लवकरच प्रशासनाच्या विविध विभागांची बैठक घेऊन महाबळेश्वर पालिका हद्दीत डॉल्बीला बंदी आणली जाईल,’ अशी भूमिका नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
लग्न समारंभ, उत्सवात लावल्या जात असलेल्या डॉल्बीमुळे अनेकांचा बळी जात आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘आव्वाज गावाचा... नाय डॉल्बी’चा ही मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये जिल्ह्यातील अनेक गावे उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. याच मोहिमेत महाबळेश्वर पालिकाही सहभागी होणार आहे, असा विश्वास नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरुन दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.
महाबळेश्वर शहरात पालिका असली तरी भौगोलिक व्याप्ती छोटी आहे. त्यातच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाबरोबरच लग्न समारंभात डॉल्बी लावण्यावर तरुणाईचा भर असतो. महाबळेश्वर शहर नावाने मोठे असले तरी कमी जागेत ते वसलेले आहे. त्यातच एकाच ठिकाणी तासन्तास डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकत असते. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असते.
शहराचे खरे आर्थिक स्त्रोत हे पर्यटन व्यावसाय आहे. जगभरातून दरवर्षी शेकडो पर्यटक भेट देत असतात. डॉल्बीच्या गोंगाटाचा या पर्यटकांना त्रास होत असतो. त्याचप्रमाणे शहरातील बाजारपेठेत असलेल्या दुकानातील काचा फुटण्याचेही प्रकार घडले आहेत. याचा सर्वाधिक त्रास हृदयरोग असलेल्या रुग्णांना बसायला लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्येही डॉल्बीबंदी असावी असे रहिवाशांचे म्हणणे होते. यासंदर्भात महाबळेश्वर पालिकेने यापूर्वी प्रयत्न केले होते. गणेशोत्सव आढावा बैठकीत डॉल्बीला बंदी घालण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. मात्र, त्यावेळी प्रशासन अन् नागरिकांतून सकारात्मक पाठबळ मिळाले नव्हते. यावेळी प्रशासनाच्या सर्वच विभागांची मदत घेऊन तरुणांमध्ये प्रबोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा तोष्णिवाल यांनी दिली.
पर्यटकवृद्धीसाठी पर्यटकांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. बाहेरील पर्यटकांना शहराची माहिती नसते. त्या काळात चौकात तासनतास डॉल्बीमुळे वाहतुकीची कोंडी झाल्यास ते हतबल होतात. अन् पुन्हा येतात विचार करतात. त्यामुळे पर्यटक दुरावल्यास येथील पर्यटन उद्योग मोडकळीस येऊ शकतो. त्यामुळे महाबळेश्वर पालिकेने डॉल्बीला विरोध करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


आव्वाज गावाचा...
..नाय डॉल्बीचा !

ऐन गर्दीच्या हंगामात वाहतुकीचे वांदे
महाबळेश्वरला दर उन्हाळ्यात लाखो पर्यटक जगभरातून येत असतात. मात्र, त्याच काळात लग्न तिथी असतात. त्याचप्रमाणे उन्हाळा सुटी, गणेशोत्सव सुटीत पर्यटक फिरण्यासाठी येतात अन् महाबळेश्वरची तरुणाई उत्साहात डॉल्बी लावून आनंद साजरा करते. त्यामुळे पर्यटकांना त्रास होतो. पर्यटक दुरावणे महाबळेश्वरबरोबरच सातारा जिल्ह्यालाही परवडणारे नाही. महाबळेश्वरची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून असल्याने या मुद्द्यावर भर देऊन डॉल्बीबंदीसाठी प्रबोधन केला जाणार आहे.



उत्सवात वाद्य वाजविण्यास, आनंद साजरा करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र आपला आनंद साजरा करत असताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉल्बी लावली तरी आवाजावर मर्यादा असणे गरजेचे आहे, मात्र तसे होत नाही. त्यामुळे कडक पावले उचलावी लागणार आहेत.
- उज्ज्वला तोष्णिवाल, नगराध्यक्षा

Web Title: Mahabaleshwar 'Dolby ban' Elgar for tourists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.