मॅगी हद्दपार; मम्मीचे वाढले कष्ट फार!

By Admin | Updated: June 10, 2015 00:32 IST2015-06-09T22:24:47+5:302015-06-10T00:32:23+5:30

सात्विक पर्याय : पारंपरिक अन्नपदार्थांचा स्वयंपाकघरात दरवळ; मुलांना पौष्टिक अन्नपदार्थ देण्याबाबत पालक बनले जागरुक

Maggie Exile; Mother's suffering is very painful! | मॅगी हद्दपार; मम्मीचे वाढले कष्ट फार!

मॅगी हद्दपार; मम्मीचे वाढले कष्ट फार!

सातारा : ‘बस दो मिनिट’ म्हणत घराघरांमध्ये सर्वांच्या परिचयाची असलेली मॅगी आता चक्क हद्दपार झाली आहे. इन्स्टंट जमान्यात आयांचे कष्ट कमी करणाऱ्या मॅगीच्या जाण्याने सात्विक पर्याय पुढे आले आहेत. त्यामुळे खूप दिवसांनी पारंपरिक अन्न पदार्थांचा स्वयंपाकघरात दरवळ वाढला आहे.मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिसे यांचे अधिक प्रमाण आढळल्याने अडचणीत आलेल्या मॅगीवरून देशभर वादळ उठले आहे. या वादंगामुळे गेल्या काही दिवसांत मॅगी चा जिल्ह्यातील खप चांगलाच खालावला असल्याचे निदर्शनास आले आहे.
इन्स्टंट आणि जंक फुडविषयी सुरू असलेले युध्द लक्षात घेता लहानग्यांच्या काळजीने घरात या सगळ्या प्रकारावर आपोआपच बंदी आली आहे. त्यामुळे चवीचे आणि पौष्टिक अन्न देण्याबाबत पालकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. कितीही उच्च दर्जाचे असले तरीही बाहेरील बंद पाकिटातील पदार्थ टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र घरोघरी पहायला मिळत आहे.
पावसाळ्यात अनेक घरांमध्ये फुटाणे, शेंगदाणे, सोयाबीन भट्टीतून भाजून आणले जातात. अलीकडच्या काही वर्षांमध्ये हे भाजणीचे डबे कमी झाले होते. मॅगीवरील बंदीमुळे पुन्हा एकदा महिलांनी आपला मोर्चा भट्टीकडे वळवत घरात डबे भरले आहेत.
अनेकदा घरात असूनही शेंगदाणे खाणे होत नाही. मॅगीवर आलेल्या बंधनामुळे आता गृहिणी पौष्टिकतेकडे वळू लागल्या आहेत. शेंगदाणे, खजूर, बदाम, गूळ एकत्र करून त्यांचे केलेले लाडू मुलंही आवडीने खातात. पण मॅगीच्या पायी हे खाणं कालबाह्य ठरू लागले होते.
अन्य शहराच्या तुलनेत साताऱ्यातील बच्चे कंपनी अद्यापही जंकच्या जाळ्यात ओढली गेली नाही, असे दिसते. पण भविष्यातील नांदी लक्षात घेता, त्यांना आत्तापासूनच या मोहापासून लांब ठेवणे आवश्यक आहे. यासाठी एका कुटुंबापासून सुरूवात करून त्याची पेरणी आप्तेष्टांपर्यंत पोहोचली पाहिजे.
मुलांना ब्रॅण्डेड खाद्यपदार्थांची नावे माहीत नाहीत, आता स्पर्धेच्या युगात त्यांचे कसे होणार, अशा चुकीच्या कल्पनांमध्ये रमण्यापेक्षा त्यांना आपल्या मातीतील आणि संस्कृतीतील अन्नपदार्थ देण्याची जबाबदारी पालकांनी पार पाडली पाहिजे. (प्रतिनिधी)


पौष्टिक पाहुणे होऊ या!
अनेक घरांमध्ये मुलांना जंक फुड देण्यावर बंधन घालण्यात आले आहे. मात्र घरी येणारा पाहूणा सोबत जो खाऊ घेवून येतो तो घातक ठरू लागला आहे. कोणाच्याही घरी जायचे म्हटले की पाकिटात बंद असलेले वेफर्स, कुरकुरे, पिझ्झा, चॉकलेट किंवा बिस्किट हे काही पर्याय अनेकांना समोर दिसतात. मुलांना आवडतं म्हणून नेण्यापेक्षा पौष्टिक घटक बघून खाऊ नेणे आवश्यक आहे. म्हणूनच कोणाकडेही जाताना मौसमी फळे, शहाळे, खजूर आदी खाद्य पदार्थ नेण्याची पध्दत रूढ होणे आवश्यक आहे. पौष्टिक पाहुणे होेणे हे यासाठी आवश्यक आहे.


संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर मुलांना भूक लागली तर काहीदा शॉर्टकट म्हणून मी मॅगी करत होते. पण गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांत वाचल्यानंतर मी आता मॅगीला हद्दपार केले आहे. दोन दिवसांपूर्वीच गव्हाच्या शेवया करून आणल्या. आता या शेवया तिखट करून मी मुलांना खायला देते.
- शीतल सोनावणे,
गृहिणी, सातारा

मॅगीबरोबर, कुरकुरे,
पिझ्झा अन् चायनीजही
साताऱ्यातील बहुतांश मुलांना मॅगीबरोबरच पिझ्झा आणि चायनीजचीही चटक लागली आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी असे काहीतरी चटपटीत खायला मिळावे, अशी अपेक्षा या चिमुरड्यांची असते. चायनीज तर गल्लीबोळात कुठेही मिळत असल्यामुळे येता जाता मुलांच्या दृष्टीस ते पडते. त्यामुळे पालकांबरोबर बाहेर पडताना ही चिमुकली मुलं ते घेण्याविषयी आग्रही राहतात. याबरोबरच सोशल स्टेटस म्हणून पिझ्झा खाण्याची क्रेझ अलीकडे वाढताना दिसत आहे. कमी पैशात मुलांचे तोंड बंद होते म्हणून कुरकुरेलाही अनेकजण पसंती देतात.


शाळांच्या दिवसांतील सोप्या रेसिपी
सोमवार : गव्हाचे पीठ तुपावर खमंग भाजा, खाली उतरवून त्यात साखर मिसळून खायला द्या. तोंडातून उडणारे फवारे एन्जॉय करत मुलं हे गट्टम करतील.
मंगळवार : भजीचे पीठ थोडे पातळ भिजवा. त्यात जरा तिळ आणि ओवा टाका. ब्रेड स्लाईस पिठात भिजवा आणि तेलात तळून काढा. चटपटीत क्रंची ब्रेड तय्यार.
बुधवार : ब्रेडचे दोन स्लाईस घ्या. एकावर तुप दुसऱ्यावर सॉस लावा, साखर भुरभुरा आणि एकत्र करून कॉफी बरोबर खायला द्या
गुरूवार : पोहे भिजवा, बटाटा शिजवा, एकत्र मिसळा, चवीनुसार तिखट मीठ टाका, गोळा करून तेलात तळा आणि सॉस बरोबर खायला द्या.
शुक्रवार : ताक, बारीक रवा, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, मीठ एकत्र करा. डोसा तव्यावर त्याच्या छोट्या पोळ्या करा. कुरकुरीत आंबोळी तयार.
शनिवार : सकाळी केलेल्या चपातीवर पिवळ्या बटाट्याची भाजी ठेवा. रोल करून ती फ्राय पॅन वर शेका. चपातीचे आवरण दोन्ही बाजूंनी कडक झाले की सॉस किंवा चटणीबरोबर व्हेज रोल रेडी!

चीजबॉलला सर्वाधिक पसंती
इन्स्टंट आणि जंक फुड कितीही टाळायचे म्हटले तरी त्यावर एका दिवसात बंदी येऊ शकत नाही. मुलांच्या तोंडची ही चव घालविण्यासाठी पालकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. मॅगीला पर्याय म्हणून अनेक प्रकार उपलब्ध नाहीत; पण चिमुकल्यांना बाजारात उपलब्ध असलेल्या चीजबॉलला विशेष पसंती असल्याचे निदर्शनास आले आहे.

Web Title: Maggie Exile; Mother's suffering is very painful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.