नव्या शासनावर मदार : सत्तांतरानंतरच्या अफवेला अखेर पूर्णविराम
By Admin | Updated: November 28, 2014 00:08 IST2014-11-27T22:21:58+5:302014-11-28T00:08:40+5:30
प्रकल्प लवकरच कार्यान्वित--काम काही काळातच सुरु

नव्या शासनावर मदार : सत्तांतरानंतरच्या अफवेला अखेर पूर्णविराम
सातारा : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अद्ययावत रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाच्या निधीसाठी प्रलंबित राहिला आहे. महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निवड केली जाणार असून भाजपने याबाबत पुढाकार घेतला आहे. या हालचालींमुळे वैद्यकीय महाविद्यालय सातारा सोडून इतरत्र होणार, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
पुणे-बंगळूर महामार्ग सातारा जिल्ह्यातून जातो. या महामार्गावर अपघाताचे प्रमाण मोठे आहे. साहजिकच शिरवळपासून कऱ्हापर्यंत कुठेही अपघात झाला तरी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सद्य:स्थितीत अवघे २५० बेडचे आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णालयाच्या यंत्रणेवर नेहमीच ताण असतो. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय व त्यालगतच शासकीय पाचशे बेडचे भव्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. हे रुग्णालय झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे. अद्ययावत आणखी तत्काळ उपचार करणे सोयीचे ठरणार आहे. तसेच नवीन रुग्णालयासाठी कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधही मंजूर झाला असल्याने कर्मचाऱ्यांची ही ताकद उपयोगी ठरणार आहे. दरम्यान, या कामासाठी केंद्र शासन ८५ टक्के तर राज्य शासन १५ टक्के निधी देणार आहे. या कामासाठी पाचशे कोटींचा निधी लागणार आहे. राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समितीने महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पाहणी करून आपला सकारात्मक अहवाल शासनाला सादर केला आहे. महसूल विभागाची खावली येथे ७५ एकर जागा आहे. तर कृष्णा खोरे महामंडळाची शंभर एकर जागा उपलब्ध आहे. या दोन्ही जागांचे प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आले आहेत. कृष्णा खोरेच्या इमारतीचे स्थलांतर करण्यासाठी पन्नास कोटींचा निधी लागणार आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास शहरालगत महाविद्यालय व रुग्णालय उभे राहू शकणार आहे. मेडिकल कॉलेज इतर जिल्ह्यात स्थलांतरित होणार असल्याच्या वृत्ताचे रुग्णालय प्रशासनाने खंडण केले असून तसेच मंत्री पाटील यांनीही पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)
प्रकल्प लवकरच कार्यान्वित
साताऱ्यासाठी प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय व अद्ययावत रुग्णालयाला शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. शासन निर्णय मागे घेतला जात नसतो, त्यामुळे साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची निर्मिती होण्यात कोणतीच अडचण नाही. येत्या काही दिवसांत कामाला प्रारंभ झालेला आपल्याला दिसेल.
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा
साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. हे काम येत्या काही काळातच सुरु होईल, याची मला खात्री आहे.
- चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री