मदन भोसले गटाकडून विरोधकांची अनामत जप्त
By Admin | Updated: May 7, 2015 00:21 IST2015-05-06T23:31:16+5:302015-05-07T00:21:22+5:30
‘किसन वीर’वर हॅटट्रिक : मतमोजणी पूर्ण; सर्व जागांवर विजय

मदन भोसले गटाकडून विरोधकांची अनामत जप्त
भुर्इंज : वाई तालुक्यातील भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक पदाच्या सर्वच्या सर्व जागा बहुमताने तिसऱ्यांदा जिंकत कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसलेंनी सहकाराला नवा आयाम देण्याच्या आपल्या प्रयत्नावर सभासदांकडून शिक्कामोर्तब करून घेतले़ कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी पूर्ण झाली.
किसन वीर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. ५) झाली़ या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते़ संचालक पदाच्या २१ जागांपैकी पाच जागा उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशीच मदन भोसलेंनी बिनविरोध जिंकल्या होत्या़ उर्वरित १६ जागांसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते़ ज्येष्ठ संचालक नारायण पवार यांनी केलेल्या बंडखोरीशिवाय शिवसेनेने १५ उमेदवार रिंगणात उतरविले होते. तर उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँगे्रसने कारखान्यावर पाचशे कोटींचे कर्ज असल्याचा आरोप करत निवडणुकीतून माघार घेतली होती़
मंगळवारी मतमोजणीच्या दिवशी दुपारी वळवाने हजेरी लावल्याने मतमोजणी प्रक्रिया सहा-सात तास लांबविण्यात आली़ पहिला निकाल रात्री उशिरा लागला. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून सी. व्ही. काळे (२७,०२२) रात्री साडेअकरा वाजता विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. ़विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : मदन भोसले (२६,६५६), गजानन बाबर (२५,३७१), मधुकर शिंदे े(२३,६९५), राहुल घाडगे (२६,७९३), प्रताप यादव (२६,३०५), प्रवीण जगताप (२६,५८६), रतन शिंदे (२६,००९), सयाजी पिसाळ (२६,२५२), चंद्रसेन शिंदे (२६,३८०), विजय चव्हाण (२६,८१०), नंदकुमार निकम (२६,६७५), सचिन साळुंखे (२६,५१०), अरविंद कोरडे (२७,०६५), आशा फाळके (२६,९६७), विजया साबळे (२५,९८८). अशा पद्धतीने शेवटचा निकाल यायला बुधवारची सकाळ झाली. निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्या नेतृत्वाखालील मोजीणी झाली. (वार्ताहर)
चोवीस हजारांहून अधिक मतांनी पराभूत...
सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी व महाबळेश्वर तालुक्यांचे कार्यक्षेत्र व ४४ हजार सभासद या कारखान्यात आहेत़ सातारा ऊस उत्पादक गटासह सोसायटी व मागासवर्गीय अशा पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या़ भुर्इंज, वाई, जावळी, बावधन, कवठे, खंडाळा व कोरेगाव ऊस उत्पादक गट (प्रत्येकी तीन जागा ), महिला राखीव (दोन जागा), भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागास प्रवर्ग अशा सोळा जागांसाठी मतदान झाले होते. सुमारे सत्तर टक्के मतदारांनी (३० हजार ७११) मतदानाचा हक्क बजावला़ मदन भोसले यांनी मतदारांशी असणाऱ्या जनसंपर्काच्या जोरावर एकहाती निवडणुकीला सामोरे जात मतदान झालेल्या सर्वच्या सर्व जागा किमान चोवीस ते सत्तावीस हजार मतांच्या फरकाने जिंकल्या़ सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त केली़