विलासकाकांनी जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST2021-01-10T04:30:22+5:302021-01-10T04:30:22+5:30
सातारा : विलासकाकांनी राष्ट्रीय विचारधारेचे राजकारण निष्ठेने करत असताना, सहकारी चळवळीतही पारदर्शी काम करून सातारा जिल्ह्याला विकासाच्या ...

विलासकाकांनी जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणले
सातारा : विलासकाकांनी राष्ट्रीय विचारधारेचे राजकारण निष्ठेने करत असताना, सहकारी चळवळीतही पारदर्शी काम करून सातारा जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणले. त्यांचे हे काम पुढे घेऊन जाण्यातूनच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील काँग्रेस भवनात शुक्रवारी जिल्ह्यातील काँग्रेसजनांच्यावतीने ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा झाली. या सभेत चव्हाण अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश मुदलीग उपस्थित होते.
उंडाळकर आणि चव्हाण कुटुंबांचा गेल्या दोन पिढ्यांचा स्नेह आहे. माझ्या वडिलांनी सार्वजनिक जीवनात सहभागी व्हावे, यासाठी काकांच्या वडिलांनी दादासाहेब उंडाळकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता. पुढील काळात प्रेमलाकाकी चव्हाण यांचाही प्रचार विलासकाकांनी केला. मलाही संसदेत जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नंतरच्या काळात आमच्यात मतभेद झाले; पण आधीच्या स्नेह संबंधापेक्षा नंतरच्या मतभेदांचीच चर्चा अधिक झाली. याबद्दल खंत व्यक्त करून चव्हाण यांनी सामान्य माणसाशी काकांनी जोपासलेल्या जिव्हाळ्याचा गौरवाने उल्लेख केला.
त्यांची काँग्रेस विचारावरील निष्ठा आणि या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी उभे आयुष्य वेचले. सहकार चळवळीत आर्थिक शिस्त आणि पारदर्शी काम करून त्यांनी जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणत लौकिक मिळवून दिल्याचे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब बागवान, आमदार आसगावकर, प्रकाश मुदलीग, हिंदुराव पाटील, विजयराव कणसे, अजित पाटील चिखलीकर, भीमराव पाटील, राजेंद्र शेलार, प्रताप देशमुख, धनश्री महाडिक आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
यावेळी विलासकाका आणि काँग्रेसचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी नगरसेवक हणमंतराव पवार यांच्या निधनाबद्दल जिल्हा काँग्रेसच्यावतीने दुखवट्याचे ठराव मांडण्यात आले. याप्रसंगी बाबासाहेब कदम, मनोहर शिंदे, जितेंद्र भोसले, चंद्रकांत ढमाळ, मनोज तपासे, नगरसेविका शैलजा खरात, मंजिरी पानसे, धैर्यशील सुपले आदी उपस्थित होते.
चौकट..
आगळा राजकीय योग
बाबूराव शिंदे यांनी विलासकाकांच्या सुरुवातीच्या राजकारणाचा आढावा घेत एका आगळ्या राजकीय योगाचा उल्लेख केला. दिवंगत दादा उंडाळकर यांनी आपले पुत्र विलासकाकांना सार्वजनिक जीवनासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांकडे सुपूर्द केले. अलीकडेच काका उंडाळकर यांनी आपले पुत्र उदयसिंह यांना दुसऱ्या चव्हाणांकडे- पृथ्वीराज बाबांकडे सुपूर्द केले. बाबा आणि काका यांच्यातील अंतर दूर व्हावे म्हणून आपल्याकडून झालेल्या प्रयत्नांचा उल्लेख करून त्याला यश आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आज काँग्रेसपुढे संघटना बळकटीचे मोठे आव्हान उभे असताना, काका आता आपल्यात नाहीत, ही उणीव सतत जाणवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
फोटो ओळ : सातारा येथील काँग्रेस भवनात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत विलासकाका पाटील उंडाळकर यांना श्रध्दांजली वाहिली.
फोटोनेम : ०९काँग्रेस