दर कमी पण साहित्य घरी येण्याची नाही हमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:45 IST2021-09-17T04:45:49+5:302021-09-17T04:45:49+5:30

प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : उत्सव काळ सुरू होण्यापूर्वी समाज माध्यमातून विविध ऑफरर्सचा ढीग मोबाइलवर येऊन धडकतो. ...

Low rates but no guarantee of material coming home! | दर कमी पण साहित्य घरी येण्याची नाही हमी!

दर कमी पण साहित्य घरी येण्याची नाही हमी!

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : उत्सव काळ सुरू होण्यापूर्वी समाज माध्यमातून विविध ऑफरर्सचा ढीग मोबाइलवर येऊन धडकतो. कमी किमतीत वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तू घरी येण्याची हमी मात्र राहिलेली नाही. या पद्धतीने फसवणूक होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. छोट्या रकमेसाठी पोलिसांत तक्रार न केल्याने हे प्रकार जाहीर होण्यासही मर्यादा येत आहेत.

गणेशोत्सवापूर्वी स्टॉक क्लिअरन्सच्या नावाने सोशल मीडियावर अल्प किमतीत आकर्षक वस्तू देण्याचे आमिष दाखविले जाते. त्यावर विश्वास ठेवून अनेक जण खरेदी करतात; पण ही खरेदी खात्रीच्या साइटवरून किंवा ॲपवरून न केल्याने ऑनलाइन पैसे जमा झाले की, लिंक गायब होते. हजार दोन हजार रुपयांसाठी कोणीच तक्रार द्यायला पुढे येत नाही; पण दिवसभरात असे दहा ग्राहक जरी त्यांना मिळाले तर दिवसाचे वीस हजार रुपये ते सहज कमवतात. त्यामुळे खरेदी करताना आवश्यक सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरते. व्यापार करणारा कोणीही तोट्यात जाऊन काहीच विकत नाही, हे सूत्र ग्राहक म्हणून डोक्यात फिट असणे महत्त्वाचे आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

कोणाची कशी होतेय फसवणूक?

महिला : दागिने, ॲक्सेसरीज, कपडे, चप्पल, संसारिक वस्तू

पुरुष : कपडे, वॉलेट, लॅपटॉप, शूज

तरुणाई : कॉस्मेटिक्स, मोबाइल ॲक्सेसरीज, ट्रेंडी कपडे, गिफ्ट आर्टिकल

अशी होतेय फसवणूक

घरात काही वस्तू घ्यायच्या म्हणून आपण काही सर्फ केो तर त्याची हिस्ट्री फेसबुकसह इन्स्टाग्रामवरही सेव्ह राहते. त्यामुळे तुम्ही शोधलेल्या वस्तूंची माहिती पुढे येत राहते. समाजमाध्यमावर अल्प किमतीतील वस्तू ‘सेलचे शेवटचे चार दिवस’ किंवा ‘अखेरचे काही तास’ असा उल्लेख करून येतात. आवडलेली वस्तू बुक केली की, ऑनलाइन पेमेंटची मागणी होते. ते पैसे दिले की, अवघ्या काही तासांत ती साइटही गुल होते. हजार दोन हजारांसाठी कोणीही पोलिसांत तक्रार करत नाही, परिणामी याबाबत कुठेच वाच्यता होत नाही.

ही काळजी घ्या!

ऑनलाइन खरेदी करताना स्पॉन्सर्ड माहितीबाबत सजगता बाळगा.

आवडलेली एखादी वस्तू ऑर्डर करताना सीओडी अर्थात कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा.

अनोळखी ठिकाणाहून खरेदी करताना केवळ आपल्याला स्वस्त मिळतंय म्हणून एकदम खरेदी करण्याचा मोह टाळा.

आवडलेली वस्तू विश्वासार्ह ॲपवरून घेण्याचा प्रयत्न करावा.

खरेदी करण्यापूर्वी ही साइट किती दिवसांपूर्वी सुरू केली, त्याला रेटिंग किती मिळाले याचीही माहिती घेणे आवश्यक आहे

कोट :

ऑनलाइन खरेदी करताना कॅश ऑन डिलिव्हरी हाच पर्याय निवडणे उत्तम राहते. कमी किमतीचे आमिष दाखवून लोकांना भुरळ पाडणे आणि त्यांना खरेदी करण्यास भाग पाडणे हा ‘ॲफिलीएट मार्केटिंग’चा प्रकार आहे. सावधपणे खरेदी करणे आणि खरेदी करणाऱ्या ॲपची विश्वासार्हता तपासो महत्त्वाचे आहे.

- मकरंद देशमुख, आयटीतज्ज्ञ, सातारा

......................

Web Title: Low rates but no guarantee of material coming home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.