सहकारातील निवडणुकांना याचिकांचा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST2021-02-06T05:12:43+5:302021-02-06T05:12:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील सहकार क्षेत्रातल्या निवडणुकांना उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकामुळे खो बसलेला आहे. आता न्यायालयाच्या ...

सहकारातील निवडणुकांना याचिकांचा खो
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यातील सहकार क्षेत्रातल्या निवडणुकांना उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकामुळे खो बसलेला आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. सोमवार अथवा मंगळवारपर्यंत न्यायालयाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, किसन वीर सहकारी साखर कारखाना तसेच कृष्णा सहकारी साखर कारखाना या तीन मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. कोरोनामुळे मुदत संपूनदेखील शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिली होती. कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने वारंवार त्याला मुदतवाढदेखील देण्यात आली होती.
जिल्हा बँकेसाठी दाखल केलेल्या पूर्वीच्या ठरावांना मान्यता द्यायची की ठराव प्रक्रिया नव्याने करायची, या मुद्द्यावर याचिका दाखल झालेले आहेत. दरम्यान, शासनाने ३१ मार्चपर्यंत निवडणूक घेण्यास स्थगिती दिली होती, त्याविरोधात महाबळेश्वर तालुक्यातील एका सभासदाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र निवडणुकांवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय शासनाने घेतला. ही निवडणूकप्रक्रिया ज्या ठिकाणी थांबली तिथूनच तिला सुरुवात करण्यात येणार आहे. शासनाने आदेश काढला असला तरी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याने सहकारातील सर्वच निवडणुकांना खो बसलेला आहे.
नव्याने ठराव घेण्याची प्रक्रिया झाल्यास राजकारण पेटणार
जिल्हा मध्यवर्ती बँक ही सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रमुख अर्थवाहिनी आहे. या बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र राज्यातील सत्तेवर असणाऱ्या महा विकास आघाडी सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत निवडणुकीला स्थगिती दिली. तसेच सोयीनुसार पुन्हा स्थगिती उठवली. तसेच पूर्वी केलेले ठराव निवडणुकीसाठी ठरवण्यात येत असल्याने निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीनेदेखील व्यूहरचना लागल्याचे चित्र असून, नव्याने ठराव येण्याची प्रक्रिया झाल्यास जिल्ह्यातील राजकारण चांगलेच भेटणार आहे.