पर्यटकांना लुटणारीटोळी गजाआड
By Admin | Updated: July 15, 2014 01:24 IST2014-07-15T01:22:04+5:302014-07-15T01:24:42+5:30
सातारा, शिरवळसह अनेक गुन्हे उघडकीस

पर्यटकांना लुटणारीटोळी गजाआड
सातारा : पर्यटनस्थळी फिरण्यास आलेल्या कुटुंबाला मारहाण करून ऐवज लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले. खंडाळा येथील वीर धरणाजवळ दाम्पत्याला याच टोळीने लुटल्याचे उघडकीस आले असून, आणखी बरेच गुन्हे या टोळीकडून उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी वर्तविली आहे.
मुख्य सूत्रधार दिलीप गोरख माळी (वय २७), विजय वसंत चव्हाण (२९ ), लखन नाना जाधव (२५, तिघे रा. सगुणामाता नगर फलटण, ता. फलटण) आणि रिझवान महमंदईलीस खान (२७, रा. संतोषी माता मार्ग, सगुणामाता नगर, फलटण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि. २२ जूनला संजय गोपाळदास शहा (५३, रा. वैद्य गणपतीसमोर, पळशी रोड, शिरवळ, ता. खंडाळा) हे त्यांच्या कुटुंबासह वीर धरणाजवळ फिरण्यासाठी गेले होते. तेथे ते फोटो काढत असताना तिथे उभ्या असणाऱ्या सहाजणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, तीन मोबाईल, ओमणी कारची चावी असा एक लाख ९१ हजारांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी अज्ञात सहाजणांविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी माकणीकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली होती. शिरवळ येथे आरोपी आल्याची माहिती घनवट यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह शिरवळ येथे छापा टाकून वरील चौघांना पकडले. गांधीनगर, कोल्हापूर, अहमदनगर तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हसवे गावाच्या कॅनॉलजवळ जोडप्यांना मारहाण करून त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि रक्कम लुटल्याचे बरेच गुन्हे या टोळीकडून उघडकीस आले आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक चिंचकर, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, हवालदार मोहन घोरपडे, उत्तम दबडे, नितीन शेळके, प्रवीण कडव, संजय जाधव, नितीन भोसले, आदी कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. (प्रतिनिधी)