मिरजेत मारहाण करून एकास लुटले

By Admin | Updated: February 27, 2016 00:42 IST2016-02-27T00:42:29+5:302016-02-27T00:42:29+5:30

शिवाजी क्रीडांगणावर घटना : पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा

Looted one by boiling a mirage | मिरजेत मारहाण करून एकास लुटले

मिरजेत मारहाण करून एकास लुटले

मिरज : मिरजेत शिवाजी क्रीडांगणावर पाचजणांच्या टोळक्याने एका तरुणास मारहाण करून १४ हजार रुपये लुटले. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली. आरोपींकडून लुटीची रक्कम व दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
कुमार लक्ष्मण पवळ (वय ३०, रा. भोसरी, पुणे) हा तरुण कामानिमित्त हुबळीला निघाला होता. रेल्वेने मिरजेत आल्यानंतर रात्री हुबळीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला वेळ असल्याने कुमार पवळ रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शिवाजी क्रीडांगणावर गेला. तेथे बसून तो जेवत असताना, तीन मोटारसायकलींवरून पाचजणांचे टोळके तेथे आले. जेवत बसलेल्या पवळ यास गांजा ओढतोस काय, अशी विचारणा करीत त्याच्या पॅन्टच्या खिशात हात घातला. पवळ याच्या खिशात १४ हजार रूपये होते. नोटांचे बंडल काढून घेताना पवळ याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, पवळ यास मारहाण करून रक्कम लुबाडून पाचहीजण मोटारसायकलवरून पळून गेले.
या घटनेबाबत कुमार पवळ याने गांधी चौक पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करीत, मारहाण करून रक्कम लुटणाऱ्या तिघांना जेरबंद केले. परवेझ ऊर्फ तबरेज बाबू तांबोळी (२४, रा. शंभरफुटी रस्ता सांगली), फारूख हुसेन बेग (३४, रा. किल्लाभाग मिरज), अजय भाऊसाहेब केटकाळे (२३, रा. कवठेएकंद, ता. शिरोळ) यांना दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांचे दोन साथीदार फरारी आहेत. गुन्ह्णासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली व लुटलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. न्यायालयाने तीन आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
मिरजेत शिवाजी क्रीडांगणावर रात्रीच्यावेळी अंधारात व्यसनी व अंमली पदार्थांची नशा करणाऱ्यांचा व गुन्हेगारांचा वावर आहे. रात्रीच्या अंधारात येथे लूटमारीसह अनेक गुन्हे घडतात. शिवाजी क्रीडांगणावर दिव्यांची व रखवालदारांची व्यवस्था नसल्याने क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे.
 

Web Title: Looted one by boiling a mirage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.