दिसामागून दिस सरले, डांबराने अंग चोरले!-- निवडणूक झाली आता कामाचं बोला
By Admin | Updated: October 21, 2014 23:38 IST2014-10-21T21:58:48+5:302014-10-21T23:38:44+5:30
सातारा शहर : कमानी हौद ते न्यू इंग्लिश स्कूल रस्त्याची व्यथा

दिसामागून दिस सरले, डांबराने अंग चोरले!-- निवडणूक झाली आता कामाचं बोला
सातारा : विकासकामांच्या बाबतीत एखादी मेख मारुन विषय प्रलंबित ठेवण्याचे राजकारण सर्वत्रच पाहायला मिळते. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण करताना ठराविक टप्प्यापर्यंत तो पूर्ण करायचा आणि काही अंतर सोडून पुढे तो पूर्ण करायचा, असा प्रकार दुर्मिळच सातारा शहरात कमानी हौद ते रजनी क्लासकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाबतीत असे घडले आहे, पालिकेने रस्त्याचे काम करताना मधले काही अंतरच डांबरीकरणात वगळले आहे. यामुळे वाहनधारकांना दिसामागून दिस सरले...डांबराने अंग चोरले!, असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.
शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे वाहनधारक रोज ठणाणा करत होते. पालिकेने विधानसभा निवडणुकीआधी काही रस्त्यांची कामे पूर्ण केली. मात्र, केलेली कामेही आता पंथाला लागण्याच्या मार्गावर आहेत. काही रस्ते पुन्हा खराब झाले आहेत. पालिकेने रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदारांची बिले पावसाळ्यानंतर देण्याचा निर्णय घेतला होता, तसेच खराब झालेले रस्ते पालिका तिजोरीला झळ न बसविता कंत्राटदारांकडून करुन घेण्यात येणार होती, त्यामुळे आता खराब झालेल्या रस्त्यांवर डांबरीकरण कधी होणार?, असा सवाल नागरिक विचारु लागले आहेत.
दरम्यान, कमानी हौद ते रजनी क्लास या अवघ्या १00 मीटरच्या अंतरामध्ये घाईगडबडीने डांबरीकरणाचे काम उरकण्यात आले होते. या रस्त्यावर कमानी हौदापासून ४0 फूट व रजनी क्लासपासून ४0 फूट डांबरीकरण करण्यात आले; परंतु मधला दहा फूट रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याचे काम सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी झाले. आता उरलेल्या दहा फुटात डांबरीकरण करण्यात कोणती अडचण येऊन ठेपली, असा सवाल नागरिक विचारत आहेत. डांबरीकरण रखडले असल्याने ते होणार आहे की नाही, याचीही शाश्वती नसल्याने वाहनधारक भीतीने गारठले आहेत.
रजनी क्लासपासून एखादा वाहनचालक वेगाने कमानी हौदाकडे येतो, त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही तर याठिकाणी तो कोसळतो. पटवर्धन पियूसी सेंटरसमोरच रस्त्याला खड्डा नजरेस पडतो. दोन्ही बाजूने रस्ता उंच आहे आणि या ठिकाणी रस्ता खोलगट आहे. पाऊस झाल्यास येथे पाणी साठून राहत आहे. खोलगट ठिकाणी वाहने घसरत आहेत. पाच महिन्यांपासून जैसे थे स्थिती असून आता पावसाळा संपला आहे, निवडणुकीचा हंगामही संपला आहे, त्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम हाती घेण्यास काय हरकत
आहे?, असे नागरिक विचारु लागले आहेत. (प्रतिनिधी)
कमानी हौदापासून रजनी क्लासकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात आले असले तरी पटवर्धन गॅरेज समोरच डांबरीकरण केले नसल्याने याठिकाणी खोलगट भाग तयार झाला आहे. रात्रीच्यावेळी गाडी चालविताना हा खोलगट भाग धोकादायक ठरत आहे. ज्यांना रस्त्यांचा अंदाज नाही ते वाहनधारक कोसळत आहेत.
- किशोर खलाटे
कारणे बास झाली....
शहरातील समस्यांबाबत नागरिकांनी प्रश्न विचारल्यानंतर पदाधिकारी व अधिकारी पावसाचे कारण पुढे करत होेते. नंतर विधानसभा निवडणूक आल्याने या निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे केले गेले. शहरात बारमाही कामे सुरु असतात. ही कामे एकदाची पूर्ण करुन इतर कामांकडेही पालिकेने बघावे, अशी टीका केली जाते. निवडणुकीमध्ये शहरातील समस्यांबाबत विरोधकांनी विद्यमान आमदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा कारणे बास झाली, असे स्पष्ट मत व्यक्त केले जात आहे.