नजर तुझी भेदक... उदे गं अंबे उदे!---लोकमत विशेष

By Admin | Updated: October 13, 2015 00:05 IST2015-10-12T22:30:24+5:302015-10-13T00:05:32+5:30

आज घटस्थापना : दुर्गादेवीच्या मूर्ती बनविण्याचे काम अहोरात्र परिश्रम -कुंभारवाड्यांमध्ये समाप्त; मूर्तीत जिवंतपणा आणण्यासाठी कलाकारांचे

Look at your clairvoyant ... Uday Gan Ambe Uday! --- Lokmat Special | नजर तुझी भेदक... उदे गं अंबे उदे!---लोकमत विशेष

नजर तुझी भेदक... उदे गं अंबे उदे!---लोकमत विशेष

सातारा : शब्दांपेक्षाही डोळ्यांची भाषा जास्त प्रभावी ठरते, असे बोलले जाते. शतकानुशतके अनेक कवींनी डोळ्यांविषयी लिहिताना आपली लेखणी झिजविलेली दिसते. लेखक, कवींनी शब्दालंकारांनी तर मूर्तिकारांनी सप्तरंगांच्या माध्यमातून तिच्या डोळ्यांतील भाव जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. दुर्गामातेची मूर्ती पाहतानाही तिच्या बोलक्या डोळ्यांतून तिच्या विविध अवतारांची सहज प्रचिती येते. बोलके, रागीट, गंभीर, शांत, असे विविध भाव डोळ्यांतून प्रकट होताना दिसतात. ही जादू असते ती केवळे कलावंतांच्या हाताची.
नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सातारा शहरात उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मंडप उभारले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती देवीच्या आगमनाची. शहरातील कुंभारवाड्यात मूर्तींना रंग देण्याचे काम गतीने सुरू आहे. मूर्तीत जिवंतपणा यावा, यासाठी कलाकार जीव ओतून काम करताना दिसत आहेत. विशेषत: मूर्तीचे डोळे अधिक बोलके दिसावेत, यासाठी कलावंत झटताना दिसत आहेत.
भैरवी, चामुंडा, पार्वती, दुर्गा, भुवनेश्वरी नारायणी, रेणुका, सरस्वती, जगदंबा, अंबा आणि कुशमंदा अशा विविध रूपांतील देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना शहरातील विविध सार्वजनिक मंडळांकडून केली जाते. दुर्गा अवतारातील मूर्ती बनविताना तिची मुद्रा रागीट दाखवावी लागते. हे कसब असते कलाकारांचे. रूद्रावतारासाठी डोळे टपोरे आणि लाल तर शांत दिसण्यासाठी निळ्या रंगाचा तर गहिऱ्या डोळ्यांसाठी लाल, पिवळ्या रंगछटांचा वापर केला जातो, असे मूर्तिकार राजेंद्र पोतदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)


दुर्गेचा रुद्रावतार तर सरस्वतीचा शांत भाव
राक्षसांचा संहार करण्यासाठी देवीने दुर्गा, कालिका, जगदंबा, चामुंडा अशी रूपे घेतल्याचे पुराणकथांमधून वर्णन आढळते. अशा रूपातील मूर्ती बनविताना देवीचा रुद्रावतार मूर्तीतून प्रकट व्हावा लागतो. त्यासाठी मूर्तीच्या चेहऱ्यावरील रागीट भाव, डोळ्यातील त्वेष नेमकेपणाने दाखविण्यासाठी एकाग्रतेने रंगकाम करावे लागते. डोळ्यांतील विविध भाव अचूकपणे दाखविण्यासाठी रंगकामावर जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याचे कुंभारवाड्यातील कारागीरांनी सांगितले.


कपाळावरील टिळ्यातही वैविध्यता
दुर्गामूर्तीच्या डोळ्यांतील विविध भाव नेमकेपणाने दाखविण्याबरोबरच कपाळावरील टिळ्यातही वैविध्यता आल्याचे दिसते. चंद्रकोर, हिरवा टिळा, चंद्रकोरीत बिंदी, जय मल्हार मालिकेतील म्हाळसाच्या कपाळावर दिसणारी वेगळी कोर आता दुर्गामूर्तीच्या भाळीही शोभून दिसत आहे.

दुर्गामातेची अनेक रूपे आहेत. प्रत्येक अवतारात देवीचे वेगळे रूप पाहायला मिळते. कधी शांत तर रुद्रावतार धारण केलेला अवतार असलेली मूर्ती, चित्र आपण पाहतो. अशा रूपातील मूर्ती बनविताना विशेष काळजी घ्यावी लागते ती रंगकामाची. रंगांच्या माध्यमातून मूर्तीत रागीट, सात्विक भाव ओतण्याचे काम करावे लागते.
- राजेंद्र पोतदार,
कारागीर, सातारा

Web Title: Look at your clairvoyant ... Uday Gan Ambe Uday! --- Lokmat Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.