लोणंदच्या भारत गिअर्सच्या कामगारांचे उद्यापासून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:37 AM2021-03-08T04:37:13+5:302021-03-08T04:37:13+5:30

कोरेगाव : लोणंद औद्योगिक वसाहतीतील भारत गिअर्स कंपनीने कामगारांवर अन्याय सुरूच ठेवला असून, सर्वच बाजूंनी मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केली ...

Lonand's Bharat Gears workers go on hunger strike from tomorrow | लोणंदच्या भारत गिअर्सच्या कामगारांचे उद्यापासून उपोषण

लोणंदच्या भारत गिअर्सच्या कामगारांचे उद्यापासून उपोषण

Next

कोरेगाव : लोणंद औद्योगिक वसाहतीतील भारत गिअर्स कंपनीने कामगारांवर अन्याय सुरूच ठेवला असून, सर्वच बाजूंनी मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने कंपनी व्यवस्थापना विरोधात मंगळवार, दि. ९ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सहायक कामगार आयुक्तांनी सोमवार, दि. ८ मार्च रोजी युनियन आणि कंपनी व्यवस्थापनाची विशेष बैठक बोलविली आहे.

भारत गिअर्स कंपनी व्यवस्थापनाने सुरुवातीपासून कामगारांना वेतनवाढ, दिवाळी बोनस, भविष्य निर्वाह निधीची वारस नोंद आदी सुविधा दिलेल्या नाहीत. कामगारांवर होत असलेल्या अन्यायामुळे त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर तेथे राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनची स्थापना केली होती. युनियनने व्यवस्थापनाला सातत्याने कामगार हिताचे निर्णय घेण्यासाठी संधी दिली. मात्र, व्यवस्थापनाने युनियनशी चर्चा न करता अल्पप्रमाणात वेतनवाढ, दिवाळी बोनससह इतर गोष्टी दिल्या.

कामगारांनी युनियनचा राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर दबाब आणला. तसेच खोटे आरोप लावून चौकशीस सुरुवात केली. ज्या कामगारांनी व्यवस्थापनाच्या दबावाला बळी पडून राजीनामे दिले त्यांच्यावरील चौकशीची कारवाई मागे घेतली. त्यांना पूर्ववत कामावर घेतले. जे कामगार युनियनबरोबर ठाम राहिले. त्यांच्यावर कारवाई सुरूच ठेवून कामापासून आणि अधिकारापासून आजअखेर वंचित ठेवण्यात आले आहे. दोनवेळेस आमदार शिंदे यांनी कंपनी कार्यस्थळावर भेट देऊनही व्यवस्थापनाने दखल घेतली नाही.

कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला होता. कंपनी व्यवस्थापनाने तरीदेखील कामगारांवर अन्यायाची भूमिका कायम ठेवली असल्याने नाईलाजास्तव मंगळवारी, दि. ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

चौकट :

सहायक कामगार आयुक्तांची आज बैठक

राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने दिलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा येथील सहायक कामगार आयुक्तांनी कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियनची संयुक्त बैठक सोमवार, दि. ८ रोजी सकाळी साडेअकरा वाजता बोलविली आहे.

Web Title: Lonand's Bharat Gears workers go on hunger strike from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.