‘लोकमत’चा आज सायंकाळी स्नेहमेळावा
By Admin | Updated: May 14, 2015 23:56 IST2015-05-14T22:46:30+5:302015-05-14T23:56:40+5:30
सहा ते नऊची वेळ : ‘राधिका पॅलेस’च्या हिरवळीवर लाभणार मान्यवरांची उपस्थिती

‘लोकमत’चा आज सायंकाळी स्नेहमेळावा
सातारा : ‘जिल्ह्यातील समाजमनाचा आरसा’ असा लौकिक प्राप्त केलेल्या ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीच्या नववा वर्धापनदिन दि. १५ रोजी थाटामाटात साजरा होत आहे. या निमित्ताने हॉटेल राधिका पॅलेस येथे शुक्रवारी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित केला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधायक प्रयत्नाचा सन्मान करीत, विजिगीषू वृत्तीच्या प्रत्येक यशस्वी सातारकराच्या नावाचा उद््घोष करीत आणि प्रत्येक विघातक शक्तीवर कठोर प्रहार करीत ‘लोकमत’ची सातारा आवृत्ती दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. जिल्ह्याची परिपूर्णतेकडे वाटचाल व्हावी, हा हेतू ठेवून ‘लोकमत’ने मावळत्या वर्षातही अनेक उपक्रम राबविले. केवळ बातमी देऊन न थांबता बातमीमागची बातमी शोधण्याचा प्रयत्न करून अचूक विश्लेषण सातारकरांसमोर ठेवले. ही विश्लेषणे, भाकिते आणि ठोकताळे अचूक ठरल्याने ‘लोकमत’वरील वाचकांचे प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत झाला आहे.
संकटग्रस्त आणि आर्थिक सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना सातारकरांच्याच सहकार्यातून आधार देण्याचे काम याहीवर्षी ‘लोकमत’ने केले आहे. दुर्धर आजाराने रुग्णालयात तळमळणारे लहानगे जीव, ऐन सणासुदीच्या दिवशी भिंत कोसळून मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तीचे अभागी कुटुंबीय, झोपडपट्टीत थंडीने कुडकुडणारी मुले अशा साऱ्यांनाच सातारकरांनी मदत केली आणि अशा प्रत्येक वेळी पुढाकार घेतल्याने ‘लोकमत’ खऱ्या अर्थाने ‘माध्यम’ ठरला. जलप्रदूषणाचा विषय हाताळताना गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींसाठी ‘लोकमत’ने आग्रह धरला आणि त्यासाठी सर्व संबंधित घटक आणि यंत्रणांकडे पाठपुरावाही केला. परिणामी मातीच्या मूर्तींचे प्रमाण, कमी उंचीच्या मूर्तींचे प्रमाण आणि घरच्या घरी विसर्जन करण्याचे प्रमाण अनेकपटींनी वाढले.
रात्री-बेरात्री एकट्याने बाहेर पडणे ज्यांच्या नशिबी येते, अशा महिलांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन आणि अशा महिलांना येणारे अनुभव लोकांसमोर आणण्यासाठी ‘लोकमत’च्या तीन धडाडीच्या महिला पत्रकार धोका पत्करून उत्तररात्री बाहेर पडल्या आणि त्यांना आलेले थरारक अनुभव ‘लोकमत’ने मांडले, तेव्हा वाचकांचा विश्वास शतगुणित
झाला.
लहान मुलांना बिनदिक्कत दारू विकणाऱ्या दुकानदारांना, बारमालकांना ‘लोकमत’ने कॅमेराबद्ध केले, तेव्हाही स्तिमित झालेल्या सातारकरांनी अशाच प्रकारे भरभरून प्रतिक्रिया दिल्या. या शिदोरीच्या जोरावर दहाव्या वर्षात अधिक जोमाने काम करण्यास ‘टीम लोकमत’ सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)
‘हेल्दी सातारा’ची भेट
वर्धापनदिनानिमित्त यावर्षी ‘लोकमत’तर्फे ‘हेल्दी सातारा’ हा विशेषांक प्रकाशित होणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी आहोरात्र राबणारे जिल्ह्यातील डॉक्टर उत्तम आरोग्याचा कानमंत्र या विशेषांकाच्या माध्यमातून देणार आहेत. तसेच सातारकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अनेक व्यक्ती या विशेषांकातून वाचकांशी संवाद साधणार आहेत.