लोकसभेला गप्प बसलो; विधानसभेला माघार नाही !
By Admin | Updated: August 4, 2014 00:26 IST2014-08-03T23:54:32+5:302014-08-04T00:26:10+5:30
रणजितसिंह निंबाळकर : कोणत्याही परिस्थितीत आगवणे उभे राहणारच

लोकसभेला गप्प बसलो; विधानसभेला माघार नाही !
फलटण : सत्ताधाऱ्यांमुळे तालुक्याच्या विकास खुंटला आहे. त्यांनी कधीच आघाडीधर्म पाळलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांमुळे मी माघार घेतली; पण आता विधानसभेला कोणाचे न ऐकता दिगंबर आगवणे यांना उभे करणारच ,’ अशी माहिती काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.
उपळवे, ता. फलटण येथे लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखाना कार्यस्थळावर ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालिका अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, सुरेश पाटील, शुगर केनचे मॅनेजर ए. के. कुलकर्णी, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, महेंद्र बेडके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव फडतरे, शहराध्यक्ष अशोकराव जाधव उपस्थित होते.
रणजितसिंह म्हणाले, ‘तालुक्यातील बाहेरील कारखान्यावर फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या हितासाठी उभारत असलेल्या लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. नोव्हेंबरपासून टप्प्याटप्याने कारखान्याचे गाळप ७ हजार ५०० मे. टनाने सुरू करणार आहे. फलटण तालुक्यात या हंगामात २२ लाख टन उसाची नोंद आहे. सध्या असलेले दोन्ही कारखाने ६ लाख मे. टनाच्यावर गाळप करू शकत नाहीत. त्यामुळे बहुसंख्य ऊसउत्पदकांना तालुक्याबाहेरील कारखानदारांना ऊस द्यावा लागतो. ऊसदर व गाळपाबाबत तालुक्याबाहेरील कारखानदारांकडून होणारी गळचेपी पाहता आपण जनतेच्या हितासाठी कारखान्याची उभारणी केली आहे.’
या कारखान्याची आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी सर्व कामे पूर्ण होतील. नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने कारखाना सुरू होणार असून, जानेवारी महिन्यात कारखान्याचा चाचणी हंगाम घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)