स्थानिक आमदार म्हणूनच निवडणुकीत लक्ष
By Admin | Updated: April 14, 2016 21:25 IST2016-04-14T21:25:02+5:302016-04-14T21:25:02+5:30
मकरंद पाटील : निकाल लक्षात आल्याने विरोधकांनी खालची पातळी गाठल्याचा आरोप

स्थानिक आमदार म्हणूनच निवडणुकीत लक्ष
लोणंद : ‘राष्ट्रवादी काँगे्रसने लोणंद शहरामध्ये जनतेला विश्वासात घेऊन विकासकामे केली आहेत. प्रचारातील राष्ट्रवादीची सरशी झाल्याने विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले होते. स्थानिक आमदार म्हणून या निवडणुकीत लक्ष घालण्याचा माझा अधिकार आहे; पण माझा धसका घेतलेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे. त्यामुळेच ते सैरभैर झाले आहेत,’ अशी टीका आमदार मकरंद पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके, रमेश धायगुडे, अनिता शेळके, मनोज पवार, विठ्ठल शेळके, भरत शेळके, नंदाताई गायकवाड, दादासो ठोंबरे उपस्थित होते.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘लोणंद शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीने दूरदृष्टी विकास आराखडा आखला आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून ही कामे करण्यासाठी स्थानिक आमदारांचे सहकार्य आवश्यक असते. मतदारसंघातील तीनही नगरपालिकांच्या कामकाजाचा अनुभव आम्हाला आहे. विकासाचा रथ आम्ही पुढे नेऊ. निवडणूक प्रचारात जे विरोधक प्रचार करत आहेत, त्यातील एकालाही नगरपालिकेचा अनुभव नाही. फक्त रावणाच्या गप्पा मारायच्या, जनतेला फसवायचे या वृत्तीला जनता थारा देणार नाही. मंत्री, संत्री आणि बाहेरचे आमदार आणून विकासकामे होणार नाहीत.’
आनंदराव शेळके-पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादीने तीन वर्षांत केलेली कामे पाहूनच जनता त्यांच्या पाठीशी राहील, विकासकामे संपत नाहीत; पण ती करण्याची धमक राष्ट्रवादीत आहे. विरोधकांना आता प्रचाराला मुद्दाच उरला नाही. त्यामुळे गुद्द्यावर येण्याचे प्रकार घडवत आहेत. अपप्रचार करून मते मिळतील या भ्रमात त्यांनी राहू नये. चांगल्या, वाईट प्रवृत्तीची जाण जनतेला आहे. राष्ट्रवादीच्या पाठीशी राहून जनताच इतिहास घडवेल.’
सभापती नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, ‘आज प्रचारात विरोधी बाजूने गप्पा मारणारे बाहेरचे गडी निवडणुकीनंतर गायब होतील. त्यामुळे त्यांच्या नादाला लागण्याचे पाप करू नका. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाचा धसका घेऊन राज्य मंत्रिमंडळाची फौज, बाहेरचे आमदार, खासदार विरोधकांनी प्रचारात उतरविले आहेत.’
विरोधकांनी बिनबुडाचे आरोप चालविले आहेत; पण आमदारांच्या विरोधात वेडेवाकडे बोलाल तर खपवून घेतले जाणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. सर्वात चांगली नगरपंचायत बनविण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.
भरत शेळके म्हणाले, ‘या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता इतिहास घडवेल. काँग्रेसचे नेते बाळासाहेब बागवान यांना धडा शिकविण्याचा विडा जनतेने उचलला आहे. थापा मारून राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत. जनतेला आता विकास हवाय जो फक्त राष्ट्रवादीच करू शकते.’ (वार्ताहर)
बोलणाऱ्यांना पदे आम्हीच दिली
विरोधी पक्षात जाऊन टीका करणारे विनोद क्षीरसागर यांना सभापतिपद राष्ट्रवादीमुळेच मिळाले; पण त्याचा उपयोग लोणंदकरांसाठी किती केला याची माहिती आदी जनतेला द्यावी. पदापुरतं स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना लोणंदकरांनी बाजूला सारावे, असे आवाहन सभेत केले.
मतांसाठी चक्क आमदार दारोदारी
बाळासाहेब बागवान : चार वर्षांत लोणंदच्या कारभारात घोटाळाच
लोणंद : ‘राष्ट्रवादीने नगरपंचायतीला विरोध तर केलाच; पण मंत्रालयात प्रस्तावाच्या फाईल अडवण्याचे काम नेत्यांनी केले. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना निवडून दिलेल्या जनतेच्या प्रश्नासाठी सरकारला जाब विचारून धारेवर धरायचे सोडून विद्यमान आमदार दारोदारी मतांसाठी फिरत आहेत. एवढी खालची पातळी राज्यात कुठल्या आमदारांनी गाठली नसेल,’ अशी खरपूस टीका काँग्रेसचे अॅड. बाळासाहेब बागवान यांनी केली.
लोणंद नगरपंचायतीच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल घाडगे, मस्कूअण्णा शेळके, दत्तात्रय खरात, सचिन शेळके, दशरथ क्षीरसागर, विकास केदारी, स्वप्नील क्षीरसागर, बाळासाहेब शेळके, इम्रान बागवान, अॅड. हेमंत खरात, बबलू मनेर आदी प्रमुख उपस्थित होते.
बाळासाहेब बागवान म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या चार वर्षांच्या काळात झालेल्या घोटाळ्याने स्थानिक नेत्यांचे हात बरबटलेले आहेत. नगरपंचायतीला खोडा घालून
स्वार्थ साधणारी राष्ट्रवादीची ही मंडळी जनतेची फसवणूक करीत आहे. विकासाच्या गप्पा मारण्यात राष्ट्रवादी मश्गूल आहे; पण लोणंदच्या विकासाचा बट्याबोळ राष्ट्रवादीनेच केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून देऊ नका,’ असे आवाहनही त्यांनी केले.
राहुल घाडगे म्हणाले, ‘प्रत्येक प्रभागात जाऊन सांगावे असे राष्ट्रवादीने कोणतेच काम केले नाही. जनतेच्या आवश्यक विकासकामांची दूरदृष्टी विरोधकांकडे नाही.’
मस्कूअण्णा शेळके म्हणाले, ‘लोणंदला नगरपंचायतीची दिशा काँंग्रेसमुळे मिळाली. काँग्रेसने पंधरा वर्षांत केलेला विकास जनतेसमोर आहे. राष्ट्रवादीने गप्पा
मारण्यापेक्षा केलेल्या कामांची
यादी जाहीर करावी.’ (वार्ताहर)