स्थानिक नेते आमदारांना गिनत नाहीत!

By Admin | Updated: April 7, 2016 23:49 IST2016-04-07T22:56:34+5:302016-04-07T23:49:09+5:30

शिवाजीराव शेळकेंचा तोफखाना : ‘त्यांनी’ कार्यकर्त्यांना मोठे होऊ दिले नाही; ‘संघर्ष करा’ या संदेशामुळेच रिंगणात

Local leaders do not count MLAs! | स्थानिक नेते आमदारांना गिनत नाहीत!

स्थानिक नेते आमदारांना गिनत नाहीत!

लोणंद : राष्ट्रवादीप्रणित पॅनेलचे नेतृत्व आनंदराव शेळके करीत असले तरी राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल नाही, याची चुणूक तगडे अपक्ष उमेदवार शिवाजीराव शेळके यांच्याशी बोलताना मिळाली. ‘स्थानिक नेते आमदारांना गिनत नाहीत’ आणि ‘संघर्ष करीत राहा, असा मला आमदारांचा संदेश आहे,’ अशी दोन सुचक वक्तव्ये करून त्यांनी चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. कार्यकर्त्यांना मोठे होऊ दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी स्थानिक नेत्यांवर केला.
लोणंद नगरपंचायतीची निवडणूक पंचरंगी लढत होणार, हे स्पष्ट होण्यापूर्वी ‘लोकमत टीम’ने केलेल्या दौऱ्यात प्रमुख स्थानिक राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. शिवाजीराव शेळके अपक्ष म्हणून रिंगणात असले तरी ते लोणंदमधील एक वजनदार व्यक्तिमत्त्व असून, लोणंद विकास सोसायटीच्या निवडणुकीत नुकतेच सत्तांतर घडवून आणणाऱ्या सर्वपक्षीय पॅनेलचे नेतृत्व त्यांनी केले होते. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे शिवाजीराव शेळके नगरपंचायत निवडणूक अपक्ष म्हणून लढवित असल्याने ‘संघर्ष करीत राहा, असा संदेश आमदार मला नेहमी देतात. त्यानुसारच मी संघर्ष करीत आहे,’ या त्यांच्या वक्तव्यातील गर्भितार्थ स्फोटक असू शकतो. ‘स्थानिक नेतृत्व आमदारांना गिनत नाही,’ हे त्यांचे वक्तव्य आणि (लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होण्यापूर्वी) ‘आमदार रोज पहाटेपर्यंत लोणंदमध्ये तळ ठोकून असतात,’ असे त्यांचे म्हणणे बरेच काही सांगून गेले.
राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पॅनेलच्या प्रमुखांप्रमाणेच स्थानिक राजकारणावर टीकास्त्रे डागताना शिवाजीराव शेळके यांच्या तोफेचे तोंडही आनंदराव शेळके यांच्या दिशेनेच वळते. दोन महिन्यांपूर्वी सोसायटीची निवडणूक सर्वपक्षीय पॅनेलच्या माध्यमातून लढविण्याचे कारण ते ‘दडपशाहीचा कारभार पटला नाही,’ असे सांगतात. ‘सोसायटीच्या सभासदांना लाभांशाचे वाटपच कधी झाले नव्हते. मीच ते प्रथम केले. सभासद आणि कुटुंबीयांसाठी अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली उधळपट्टी नको, असे मी निक्षून सांगितले. या भूमिकेमुळेच सोसायटी जिंकू शकलो,’ असे ते म्हणाले.
‘सोसायटीप्रमाणेच नगरपंचायतीसाठीही सर्वपक्षीय पॅनेल करता आले असते; परंतु प्रथम काँग्रेसने आणि नंतर इतर पक्षांनीही आपापले पॅनेल जाहीर केले. राष्ट्रवादीमध्ये मी सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता म्हणून आलो; परंतु स्थानिक नेतृत्व कार्यकर्त्याला मोठे होऊ देत नाही. त्यामुळेच जिल्हा परिषदेचे तिकीटही मला मिळू शकले नाही. स्थानिक नेते गळचेपी करतात. आमदारांना लोणंदमध्ये सर्वाधिक मते माझ्या प्रभागातून आणि प्रभावातून मिळवून दिली आहेत. याच बळावर मी रिंगणात अपक्ष म्हणून आहे,’ असे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)

सर्वपक्षीय कार्यकर्ते सोबत
आपल्या वॉर्डातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा दावा शिवाजीराव शेळके यांनी केला आहे. ‘माझ्या नावाला कुणाचाही आक्षेप नाही. मी माझ्या वॉर्डासाठी भूमिगत गटार योजना मंजूर करून आणली होती. स्थानिक नेतृत्वाने ती होऊ दिली नाही, हे सर्वांनी पाहिले आहे. माझ्या वॉर्डात काँग्रेसचा उमेदवार असला, तरी भाजपने उमेदवार दिलेला नाही. कार्यकर्ते तर सगळेच माझ्यासोबत आहेत,’ असे ते म्हणाले.


आपल्याच माणसाची जिरवाजिरवी
४‘आपल्याच माणसाची जिरवाजिरवी करायची, त्याची कामे करायची नाहीत, कार्यकर्त्याला मोठे होऊ द्यायचे नाही, असे प्रकार स्थानिक नेतृत्व सातत्याने करीत आहे. तरीही आमदार त्यांचे एवढे का ऐकतात, हेच कळत नाही. खरंतर आमदारांनाही स्थानिक नेत्यांनी कधी फारसे महत्त्व दिलेले नाही. आम्ही सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते आहोत. म्हणूनच आम्ही अपक्ष निवडणूक लढवीत असलो तरी माझ्यावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही,’ असे शिवाजीराव शेळके यांनी सांगितले.

मोट बांधणे परिस्थितीवर अवलंबून
शिवाजीराव शेळके यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवार लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीत आपापल्या वॉर्डातून अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. त्यातील काही वजनदार उमेदवार असल्यामुळे किमान सहा प्रभागांच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती मिळाली. कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि काही अपक्ष विजयी झाले तर सत्तास्थापनेत त्यांना मोठे महत्त्व येऊ शकते. अशा वेळी अपक्षांची मोट आपण बांधणार का, असे विचारले असता, ‘ते परिस्थितीवर अवलंबून असेल,’ असे उत्तर शिवाजीराव शेळके यांनी दिले.

Web Title: Local leaders do not count MLAs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.