वीस रुपयांसाठी गमावला जीव
By Admin | Updated: December 2, 2014 00:25 IST2014-12-01T22:59:07+5:302014-12-02T00:25:59+5:30
पुणे जिल्ह्यातील घटना : दोन लुटारूंनी केला माणवासीयाचा खून

वीस रुपयांसाठी गमावला जीव
सातारा : मूळच्या माण तालुक्यातील रहिवाशाला केवळ वीस रुपयांसाठी जीव गमवावा लागला. पुणे जिल्ह्यातील काळेपडळ येथे दोघांनी डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
पोपट किसन आवटे (मूळ रा. माण, सध्या रा. काळेपडळ, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास काळेपडळ येथील रेल्वे फाटकाजवळून ते निघाले होते.
त्यावेळी संदीप ऊर्फ सोन्या दत्तात्रय राख (वय २०) आणि अक्षय दत्तात्रय भालेराव (वय २०, दोघे रा. हडपसर, मूळ सोलापूर) या दोघांनी त्यांना गाठले. गाडीचा धक्का मारून त्यांना खाली पाडले.
त्यांच्याशी वाद घालत झटापट करून खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न दोघांनी केला. आवटे यांनी विरोध केला असता त्यांना मारहाण करून या दोघांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला. खिशातील रक्कम आणि दोन मोबाइल घेऊन त्यांनी पळ काढला. आवटे यांच्या खिशात अवघे वीस रुपये होते.
पोलिसांना आवटे यांचा मृतदेह सापडला होता; मात्र खुनाचे कारण आणि आरोपींबद्दल माहिती मिळत नव्हती. निरीक्षक सुनील यादव यांना राख आणि भालेराव यांच्याबद्दल माहिती मिळताच त्यांनी सापळा लावून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाइल आणि गुन्ह्याच्या वेळी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. भालेराव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर दरोडा आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)