विसर्जन तळ्यात लागला जिवंत झरा
By Admin | Updated: July 20, 2014 23:17 IST2014-07-20T23:15:54+5:302014-07-20T23:17:21+5:30
पालिकेचा पुढाकार : गोडोलीत शेततळ्याच्या धर्तीवरील तलावात २०० मूर्तींचे विसर्जन होणार

विसर्जन तळ्यात लागला जिवंत झरा
सातारा : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाच्या दृष्टीने सातारा पालिका सरसावली असून गोडोली येथे गणेश विसर्जनासाठी शेततळ्याच्या धर्तीवर तलाव खुदाई सुरू झाली आहे. या तळ्यात सुमारे सत्तर मोठ्या मूर्ती अगणित घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्य होणार आहे. दरम्यान, खुदाई काम करताना जिवंत झरा लागल्याने हे तळे कायमस्वरूपी विसर्जन व्यवस्था म्हणून वापरता येणार आहे.
गणेश मूर्ती विसर्जनामुळे मंगळवार तळे परिसरात निर्माण झालेले प्रदूषण आणि तळ्यातील पाणी सोडल्यानंतर मूर्तींचे दिसू लागलेले भग्नावशेष यामुळे हा विषय यंदा अत्यंत गांभीर्याने घेतला गेला. ‘लोकमत’ने मंगळवार तळ्याची अवस्था आणि नागरिकांचे प्रश्न मांडून शाडूच्या मूर्ती आणि पर्यावरणपूरक विसर्जन यासाठी आग्रही भूमिका घेतली. कर्तव्य सोशल ग्रुप आणि इतर पर्यावरणप्रेमी संस्था या मोहिमेत हिरीरीने उतरल्यात. खासदार उदयनराजे भोसले यांनीही मंगळवार तळ्यात विसर्जन नको, अशी भूमिका घेतली.
पालिकेने कर्तव्य ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सव मंडळांची बैठक घेऊन याकामी पुढाकार घेतला. कायमस्वरूपी मूर्तींसाठी अनेक मंडळे पुढे येऊ लागली. याच मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून पालिकेने शेततळ्यांच्या धर्तीवर विसर्जन तलाव निर्माण करण्यास सुरूवात केली
आहे.गोडोली नाक्यावरून जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या जवळ एका बागेत पालिकेच्या जागेत कृत्रिम तळ्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. याच पद्धतीने मध्यवर्ती बसस्थानकासमोर हुतात्मा स्मारकाजवळ विसर्जनासाठी कृत्रिम तळे तयार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गणेश विसर्जनासाठी यंदा गोडोली आणि बसस्थानकासमोर हुतात्मा स्मारकाजवळ नवीन दोन कृत्रिम तळी निर्माण केली जाणार आहेत. गेल्या वर्षी सदर बझार येथे दगडी शाळेजवळ आणि मोती तळ्याच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या तळ्यांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे.
- दिलीप चिद्रे,
अभियंता, नगरपालिका
गणेश मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन यंदा नगरपालिका आणि सर्व नगरसेवक यांच्या पुढाकारातून गोडोली येथे कृत्रिम तळे बांधले आहे. यामध्ये सुमारे दोनशे मूर्ती विसर्जनाची सोय होणार आहे.
- अॅड. दत्ता बनकर,
पक्षप्रतोद, सातारा विकास आघाडी