साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:35+5:302021-03-20T04:39:35+5:30
पोहण्याकडे कल सातारा : ‘मार्च हिट’मुळे उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. तापमानातील वाढत्या उष्म्यामुळे ग्रामीण भागात नदी, तलावावर पोहण्यासाठी ...

साहित्य भेट
पोहण्याकडे कल
सातारा : ‘मार्च हिट’मुळे उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. तापमानातील वाढत्या उष्म्यामुळे ग्रामीण भागात नदी, तलावावर पोहण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे बच्चे कंपनी नदी व विहिरींकडे आपला मोर्चा वळविला आहे तसेच जिल्ह्याच्या तापमानतही वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत.
बिलासाठी जनजागृती
सातारा : नवनवीन शक्कल लढवत ‘महावितरण’चे अधिकारी व कर्मचारी जनजागृती करून वीज बिल वसुली करत आहेत. भरमसाठ वीज बिले, बिलांची वसुली न झाल्यास वीज तोडण्याची कारवाई यामुळे ग्राहकांच्या नाराजीस कारणीभूत ठरलेल्या ‘महावितरण’ने आता ग्राहकांनी वीज बिल भरावे, यासाठी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला आहे.
कचऱ्याचे साम्राज्य
सातारा : सातारा शहरातील तसेच उपनगरांतील कचरा समस्या मोठी होत असताना परळी खोऱ्यातील उरमोडी केटी बंधाऱ्याजवळही कचऱ्याचे आगार निर्माण होत आहे. परळी खोरे हा तसा भाग घाट रस्ते अन् दऱ्या-खोऱ्यांचा परिसर आहे. त्याच भागातील उरमोडी जलाशय हे दुष्काळी भागासाठी एक वरदानच ठरले असले तरी उरमोडी केटी बंधाऱ्यानजीक कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे.
डिझेलचा तुटवडा
सातारा : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा आगारात गुरुवारी सकाळपासूनच डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे लांबपल्ल्यासह ग्रामीण भागातील फेऱ्यांवर त्याचा परिणाम झाला. मात्र, दुपारी डिझेलचा टँकर आल्यानंतर फेऱ्या सुरळीत सुरू झाल्या. सातारा आगारातून दररोज सुमारे लांबपल्ल्यासह ग्रामीण भागात एस. टी. बसेस धावत आहेत.
शेतकरी हवालदिल
सातारा : सातारा शहर व परिसरातील गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत आहे. त्यातच गुरुवारी काही काळ आभाळ काळवंडल्यासारखे झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांत अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. आता सुगीचे दिवस असताना हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पाऊस पडेल की काय? या चिंतेने शेतकरी त्रासला गेला आहे.
वनसंपदा खाक
सातारा : पाचवड (ता. खटाव) येथील गावाशेजारी असलेल्या डोंगरास लागलेल्या आगीत वनक्षेत्रातील व खासगी जागेतील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा जळून खाक झाली ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आणण्यास वनविभागाला रात्री उशिरा यश आले. पाचवड, मुळीकवाडी, गारुडी व तरसवाडी या डोंगरारांगात दरवर्षी वणवा लागण्याचे प्रकार घडतात.
ग्राहक दिन साजरा
म्हसवड : माण तालुक्यात ग्राहक पंचायतीतर्फे येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. येथील नगर वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात ग्राहक पंचायतीचे राज्य सहसंघटक सुरेश उबाळे यांच्या हस्ते हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी ग्राहक पंचायतीचे माण तालुकाध्यक्ष अजित काटकर, शहराध्यक्ष विजय भागवत, दत्तात्रय वीरकर, शेखर वीरकर, सोनप्पा नरळे, मनोज डोंगरे, सविता राऊत उपस्थित होते.