सातारा: कोरोना रुग्णांवर एकीकडे उपचारासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत असतानाच दुसरीकडे या यंत्रणेला गालबोट लागले आहे. कोरोनाग्रस्तच्या मृत्यूनंतर त्याचे साहित्य गायब झाल्याने नातेवाईकांना संताप व्यक्त करण्यापलीकडे काही करता आले नाही.
जिल्ह्यात अशा प्रकारच्या केवळ दोन तक्रारी समोर आल्या असल्या तरी अनेक ठिकाणी असे बरेच प्रकार घडले मात्र ते उघडकीस आले नाहीत.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा शिरकाव झाल्यापासून आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोनाग्रस्तांचे दागदागिने व साहित्य गायब होण्याचे प्रकार वाढल्याने नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ अशा प्रकारच्या दोन तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामध्ये पहिली तक्रार जिल्हा शासकीय रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त मृत महिलेचे दागिने चोरल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. संबंधित कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या गळ्यातील दागिने अचानक गायब झाले. यानंतर कोरोनाग्रस्त मृत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये बराच गोंधळ घातला. मात्र आपला जिवाभावाची व्यक्ती आपल्यातून निघून गेली, हे दुःख त्यांना होतं. त्यामुळे दागिन्यासाठी नातेवाइकांनी पुढे तक्रार केली नाही. अशाच प्रकारे दुसरी घटनाही साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयांमध्ये घडली. शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या बहिणीजवळ असलेला अँड्रॉइड मोबाईल आणि इतर साहित्य त्या रुग्णालयातून अचानक गायब झाले. खुद्द पोलीस कर्मचारीही ते साहित्य परत मिळावे म्हणून हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी वारंवार फोन करून विचारणा करत होते. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन शेवटपर्यंत त्यांना साहित्य मिळालेच नाही. अशा प्रकारच्या घटना बऱ्याच ठिकाणी घडल्या असतील मात्र आपला जवळचा व्यक्ती निघून गेल्याचे दुःख अनेकांना असल्यामुळे त्यांनी तक्रार केली नाही. याचा अशाप्रकारे जर काहीजण गैरफायदा घेत असतील तर ते योग्य नाही. आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या गोष्टीवर लक्ष देऊन त्वरित हे प्रकार रोखावे, एवढीच अपेक्षा सर्वसामान्य नातेवाईकांची आहे.
चौकट: गळ्यातील मंगळसूत्र गायब
कोरोनाग्रस्त एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब झाले. त्यानंतर नातेवाईकांनी संबंधित रूग्णालयाच्या आरोग्य कर्मचारी, व वरिष्ठांना जाब विचारला. मात्र गळ्यातील चोरीस गेलेले मंगळसूत्र नेमके कुठे गेले याचा थांगपत्ता मात्र कोणालाच लागला नाही. पुढे याची पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाली नाही.
चौकट: पुढच्याला ठेच मागचा शहाणा
जिल्ह्यात अशा प्रकारचे साहित्य जाण्याच्या घटना दोन घडल्या आहेत. या दोन घटनांमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेचा मोठा गहजब उडाला. त्यामुळे यातून इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगलाच धडा घेतला. त्यामुळे त्यांच्यावर वर्तणूकमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले. आपल्यावर आरोप झाले तर आपली नोकरी ही जाईल, याची धास्तीही आरोग्य कर्मचाऱ्यांना असल्यामुळे या तक्रारी पुढे आल्या नाहीत.
चौकट: रुग्णालयात तक्रार पेटी आवश्यक
खरंतर कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच असतात. मात्र नातेवाईकांना नेमकी कुठे तक्रार करावी, हे माहीत नसते. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. प्रशासनाने रुग्णालयात तक्रार पेटी ठेवून नातेवाईकांना काही तक्रार असल्यास या तक्रार पेटी मध्ये आपला तक्रार अर्ज टाकावा, असे आवाहन करणे गरजेचे आहे. तरच यातील वस्तुस्थिती समोर येईल.
आकडेवारी:
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण तक्रारी प्राप्त झाल्या-२
एकूण कोरोना रुग्ण- १७६६६३
बरे झालेले रुग्ण - १५७९४४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण-१३९०५
मृत्यू- ३८८७