पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By Admin | Updated: July 29, 2016 00:26 IST2016-07-29T00:16:09+5:302016-07-29T00:26:48+5:30
कऱ्हाड अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून करणाऱ्यास जन्मठेप
कऱ्हाड : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोन चिमुरड्यांचा निर्घृण खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. सी. पी. गड्डम यांनी गुरुवारी ही शिक्षा सुनावली. मन्सूर मकबूल मुल्ला (वय ४२, रा. म्हासोली, ता. कऱ्हाड) असे आरोपीचे नाव आहे.
पत्नी पाकिजा (३०), मुलगी अफ्रीन (९) व मुलगा जुमेर (६ महिने) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. म्हासोली येथील मन्सूरचा मुसांडेवाडी-पुसेसावळी येथील पाकिजा हिच्याशी विवाह झाला होता. २०११-१२ मध्ये मन्सूर बेरोजगार होता़ तो स्वत:हून कोणतेही काम करीत नसल्यामुळे या कुटुंबाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस हलाखीची बनली़ अशातच तो पत्नी पाकिजाच्या चारित्र्यावर संशय घेत होता़ त्या कारणावरून वारंवार दोघांमध्ये भांडणे होत होती़ डिसेंबर २०११ मध्ये पाकिजाच्या बाळंतपणासाठी हे कुटुंब तिच्या माहेरी मुसांडेवाडी येथे राहण्यास गेले होते. त्याठिकाणीही संशयावरून मन्सूर पत्नीशी वाद घालीत होता़ आॅगस्ट २०१२ मध्ये मन्सूर हा पत्नी पाकिजा, मुलगा जुमेर व मुलगी अफ्रीन यांच्यासह म्हासोली येथे स्वत:च्या घरी वास्तव्यास आला़ मात्र, म्हासोलीत आल्यापासून दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू होती़
दि. ३ आॅगस्ट २०१२ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मन्सूरने स्वयंपाक करीत असलेल्या पाकिजाच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून केला़ त्यानंतर पाकिजाच्या मांडीवर असलेल्या जुमेरच्या डोक्यातही त्याने कुऱ्हाडीचा घाव घातला़
या प्रकाराने भेदरलेली अफ्रीन रडत असताना मन्सूरने तिला लाथ मारून जमिनीवर पाडले़ तसेच हातातील कुऱ्हाडीने तिच्या पाठीत घाव घातला़ वर्मी घाव बसल्याने तिघांचाही मृत्यू झाला़ खून केल्यानंतर मन्सूर काहीकाळ घरातच थांबून होता. काही वेळानंतर त्याने नातेवाईक व ग्रामस्थांना फोन करून आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. याप्रकरणी मन्सूरला पोलिसांनी अटक केली.
कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बरकत मुजावर यांनी या खटल्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर केलेले पुरावे ग्राह्ण मानून न्या. गड्डम यांनी आरोपी मन्सूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात एकूण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाला पैरवी अधिकारी ए. के. पवार, आर. बी. घाडगे, एस. एम. महाडिक, डी. बी. कोळी, आर. बी. पवार, सिकंदर पठाण यांनी सहकार्य केले.
न्यायालयाने मन्सूरला तिघांच्या खुनप्रकरणी दोषी धरून जन्मठेप, एक हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. तसेच शारीरिक व मानसिक छळ प्रकरणात तीन वर्षे सक्तमजुरी, पाचशे रुपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे.