कासवर जाताना परवाना हवाच

By Admin | Updated: September 20, 2014 00:35 IST2014-09-19T22:43:31+5:302014-09-20T00:35:45+5:30

नियमावर बोट : वाहतूक पोलिसांची करडी नजर

Licensed to go to Kasas | कासवर जाताना परवाना हवाच

कासवर जाताना परवाना हवाच

सातारा : जागतिक वारसास्थळ असलेल्या कासवर जाताना आता परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या हंगामातील फुले बघण्यासाठी पर्यटकांची रीघ आता कास पठाराच्या दिशेने वळू लागली आहे. पठारावर जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांची काटेकोरपणे तपासणी सध्या वाहतूक विभाग करत आहे.
सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शहराच्या पश्चिमेकडील कास पठाराला तर जागतिक वारसास्थळ म्हणून जागतिक दर्जा मिळाला आहे. साधारण सप्टेंबर -आॅक्टोबर मध्ये येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. जिल्हा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची रीघही यात मोठी असते.
लक्झरी किंवा खासगी बस यांनी प्रवासी घेऊन जाताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून तात्पुरता परवाना घेणे बंधनकारक आहे. तरीही अनेक वाहतूकदार हा परवाना न घेता कर चुकवून बिंधास्त प्रवासी वाहतूक करतात. यामुळे प्रवाशांबरोबर शासनाचीही फसवणूक केली जात आहे. हा परवाना वाहनाच्या सीटनुसार आकारला जातो. हा परवाना मिळण्यासाठी महिनाभर अथवा आदल्या दिवशीही काढला जाऊ शकतो. या कराची रक्कमही प्रवाशांकडूनच तिकिटाच्या रूपात घेतली जाते. त्यामुळे प्रवाशांची फसवणूक होत आहे.
दरम्यान, गत सप्ताहापासून पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. अनेकजण जिल्ह्याबाहेरून लक्झरी व खासगी बसमधून या ठिकाणी येत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक पोलिसांनी मागील काही दिवसांपासून ही तपासणी सुरू केली आहे. नियमात न बसणाऱ्या किंवा कर बुडविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. (प्रतिनिधी)

आरटीओ चा गचाळ कारभार
कोणतेही पर्यटकांचे वाहन साताऱ्यात दाखल होणार असेल, तर त्यासाठी आवश्यक परवाना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून घेतला जातो. परवाना घेऊन जाताना प्रवास करणाऱ्या सर्वांची नावे कागदावर लिहून देऊन त्याची नोंद करावी लागते. अनेकदा कर्मचाऱ्यांच्या हातातील अतिरिक्त काम लक्षात घेता, हे कर्मचारी परवान्याचा शिक्का मारतात; पण प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे नावे मात्र कागदावर लिहीत नाहीत. त्यामुळे नेमके कोण प्रवास करत आहे, याची कोणतीच अधिकृत माहिती प्रशासनाकडे उपलब्ध राहत नाही.

पर्यटक अनभिज्ञ...!
कास पठारावर जाताना असा काही परवाना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून घ्यावा लागतो, याविषयी पर्यटकांना या गोष्टीची माहिती नसते किंवा काहीदा कुठे इतकी झगझग करा म्हणून काही वाहनचालक हा परवाना घेणे टाळत आहेत. असा परवाना न घेणाऱ्यांना एक हजार ते पाच हजारांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे. परवाना चुकविणाऱ्या वाहनाची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. एक वाहन तपासायला साधारणत: अर्धा ते एक तास लागतो. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांना तपासणी होईपर्यंत गाडीत ताटकळत बसावे लागते.

Web Title: Licensed to go to Kasas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.