पोस्ट आॅफिसला लेटलतिफांचे ग्रहण

By Admin | Updated: July 15, 2016 22:38 IST2016-07-15T21:46:29+5:302016-07-15T22:38:45+5:30

शिरवळकरांचे हाल : तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

Lett's reception to Post Office | पोस्ट आॅफिसला लेटलतिफांचे ग्रहण

पोस्ट आॅफिसला लेटलतिफांचे ग्रहण

शिरवळ : ‘थांबा...शिरवळ पोस्ट आॅफिसला येताय...जरा उशिराने या..,’ असे निरोप सध्या पोस्ट आॅफिसकडे येणाऱ्या नागरिकांना देत आहे. शिरवळ पोस्ट आॅफिस व सातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही वेळ शिरवळमधील नागरिकांवर आली आहे. त्यामुळे शिरवळ येथील पोस्ट आॅफिस शिरवळकरांसाठी बंद करणे आहे, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
औद्योगिकदृष्ट्या प्रगत होत असलेले शिरवळ हे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी जय तुळजाभवानी मंगल कार्यालयासमोर पोस्ट आॅफिस असून, पोस्ट आॅफिस म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था शिरवळकरांची झाली आहे. येथील पोस्टमास्तरसह कर्मचारी म्हणजे ह्यआओ जाओ घर तुम्हाराह्ण या उक्तीप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून वागत आहेत.
तात्पुरत्या स्वरूपात आलेला एक कर्मचारी तर नागरिकांना व विचारणा करण्यास आलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनाही अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
विशेष म्हणजे याबाबत सातारा येथील पोस्ट आॅफिसच्या प्रवर अधीक्षक कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता नेमकी कोणती तक्रार आहे हे न ऐकताच तुम्हाला काय सांगायचे आहे ते एका ओळीमध्ये किंवा चार ओळीमध्ये लेखी सातारा कार्यालयाला पाठवा आम्ही तुम्हाला पत्ता देतो, असे सांगितले.
शिरवळकरिता येणारे विविध पार्सल, पत्र व इतर कागदपत्रही साताराहून सरळ शिरवळला न येता वाई येथे पाठवून मग एसटी ने याठिकाणी पाठवून मगच शिरवळ पोस्ट आॅफिसला पाठविले जातात. त्यामुळे शिरवळ पोस्ट आॅफिसमधील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वाईहून येणाऱ्या पार्सलची वाट पाहत शिरवळ बसस्थानकात तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे.
विशेष म्हणजे शिरवळमधील तब्बल ९२ शिक्षकांच्या पीपीएफचा प्रश्न हा फेब्रुवारी महिन्यापासून विविध कारणांमुळे तिष्ठत पडला आहे. तिच अवस्था आरडी खात्याबाबतही झाली आहे तर येथे नेमण्यात आलेला कर्मचारी वर्गही नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात दिलेला असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

जनसेट अभावी काम ठप्प
शिरवळ पोस्ट आॅफिसमधील जनसेट केवळ शोपीस बनले आहे. जनसेटमधील बॅटऱ्या चोरीला गेल्याने शिरवळमधील पोस्टमास्तर यांनी नवीन बॅटऱ्या खरेदीकामी पाठविलेले कोटेशन सातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाने अद्यापही मंजूर न केल्याने जनसेट एक वर्षभरापासून बंद अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे पोस्ट आॅफिसची लाईट गेल्यास येथील कामकाज पूर्णपणे ठप्प पडत आहे.


दोघांवरच अख्ख्या शिरवळचा ताण
सातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाने येथील पोस्टमन कमी केल्याने शिरवळ व परिसरातील पत्रवाटपाचा सगळा बोजा हा दोनच पोस्टमनवर आला आहे. एकीकडे केंद्र शासनाकडून पोस्ट आॅफिसचे रूपांतर बँकेमध्ये करण्याचे प्रयत्न सुरू असताना सातारा येथील प्रवर अधीक्षक कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका शिरवळकरांना विशेषत: महिला वर्ग व वयोवृद्धांना बसत आहे.

Web Title: Lett's reception to Post Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.