पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तरेश्वराला साकडे
By दीपक शिंदे | Updated: January 14, 2025 23:21 IST2025-01-14T23:20:48+5:302025-01-14T23:21:09+5:30
त्यांच्यासोबत रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले हे देखील उपस्थित होते.

पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तरेश्वराला साकडे
सातारा : राज्यातील सर्व जनतेला सुखी-समाधानी आणि आनंदी ठेव असे मागणे मागत असतानाच जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ देत असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामदेवता उत्तरेश्वर यांना घातले. दरे (ता. जावली) येथील ग्रामदेवता उत्तरेश्वराच्या दोन दिवसीय यात्रेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्तिभावे देवाची पूजा करत हे साकडे घातले. त्यांच्यासोबत रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले हे देखील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला चांगलं आरोग्य लाभू दे, राज्यातील जनता सुखी समाधानी राहू दे. उत्तरेश्वर मंदिराचे सुमारे चारशे कोटीचे काम आहे. हे काम पुढील वर्षापर्यंत पूर्ण होणार आहे. या ठिकाणी मंदिराच्या उभारणीसोबतच रोप वे करण्याचे देखील प्रस्तावित आहे. तसेच महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक या भागात येऊन राहिले पाहिजेत यासाठी कॉटेज आणि हाऊस बोटसारखी व्यवस्था करण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांनी दोन दिवसाच्या दौऱ्यात कोयना, तापोळा, महाबळेश्वर विभागाच्या पर्यटनावर साताऱ्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. दरम्यान, त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन स्थळ असलेल्या मुनावळे या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वासोटा किल्ल्यावर देखील गेले होते. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी कोकण व कोयनेला जोडणाऱ्या कोयना जलाशयावरील पुलांची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरेश्वराच्या चरणी लीन होत पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ दे, असे म्हणत उत्तेश्वराला साकडे घातले.