‘ओपन बार’मध्ये आपण सीईओंना घेऊन बसू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:26 IST2021-09-02T05:26:08+5:302021-09-02T05:26:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्याच मजल्यावर ‘ओपन बार’चा मुद्दा ...

Let's take the CEOs to the 'open bar'! | ‘ओपन बार’मध्ये आपण सीईओंना घेऊन बसू !

‘ओपन बार’मध्ये आपण सीईओंना घेऊन बसू !

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्याच मजल्यावर ‘ओपन बार’चा मुद्दा जोरात गाजला. एका सदस्याने तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेऊन आपण बारमध्येच बसूया, असे ठामपणे सांगितले. तसेच याच सभेत तैलचित्रे आणि समित्यांच्या अभ्यास सहलीचा मुद्दाही चांगलाच गाजला.

जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. या सभेत विषय पत्रिकेवरील ३० आणि ऐनवेळच्या विषयावर चर्चा झाली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायचे अविनाश फडतरे, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याणच्या सभापती सोनाली पोळ यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

सभेला सुरुवात झाल्यावर सुरुवातीला अभिनंदनाचे ठराव झाले. त्यानंतर ग्रामपंचायतींनी पथदिव्याचे बिल भरण्याचा विषय सदस्यांनी उपस्थित केला. यावर पथदिव्यांच्या थकबाकीवर १८ टक्के व्याज घेऊ नये, अशी मागणी सदस्यांनी केली. मात्र, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शासनाचा निर्णय असल्याचे सांगून चेंडू पुढे ढकलला. त्यानंतर सदस्य अरुण गोरे यांनी सभागृहात दिवंगत माजी आमदार सदाशिवराव पोळ व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे तैलचित्र लावण्याचा मुद्दा उपस्थित केला. तिसऱ्या सभेतही याबद्दल निर्णय होत नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. यावर वसंतराव मानकुमरे यांनी तुमचा पोळतात्यांना विरोध होता ना? मग, मी पण उपाध्यक्ष होतो. आमच्यासाठीही तशी तरतूद करुया, असे सभागृहात सांगून टाकले. यानंतर गोरे आक्रमक झाले. वातावरण गरम होत असल्याचे पाहून अध्यक्ष कबुले यांनी आपल्यासाठी सर्वच नेते आदरणीय आहेत. त्यांच्या भावनाशी खेळत नाही. पण, यासाठी आपणाला कुठेतरी धोरण ठरवावे लागेल. पुढील सभेपूर्वी हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन दिले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

ऐनवेळच्या विषयात ‘ओपन बार’वर वसंतराव मानकुमरे यांनी शाब्दिक फटकारे ओढले. ‘लोकमत’मध्ये बुधवारी जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर ‘ओपन बार’ अशी बातमी प्रसिध्द झाली आहे. या अनुषंगाने मानकुमरे यांनी सभागृहात जोरदार आवाज उठविला. जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर अन् उपाध्यक्षांच्या शेजारीच ‘ओपन बार’ भरतोय. उपाध्यक्षांना घेऊन तेथे बसूया. सीईओंनाही तेथे बसण्यासाठी नेऊ. त्यासाठी जिल्हा परिषदेने तरतूद केली आहे का ? तेथे कोणती-कोणती दारू मिळतेय तेही पाहूया. त्यासाठी आपण समक्ष बघू, असे मानकुमारे यांनी स्पष्टपणे बोलून दाखविले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा आणि उपाध्यक्ष विधाते यांनी माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

या सभेत सदस्य भीमराव पाटील, दीपक पवार, उदयसिंह पाटील, सुरेंद्र गुदगे, दत्ता अनपट, मनोज जाधव, सागर शिवदास, अर्चना देशमुख, डॉ. भारती पोळ यांनीही आपले मुद्दे मांडले.

Web Title: Let's take the CEOs to the 'open bar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.