प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST2021-01-15T04:33:09+5:302021-01-15T04:33:09+5:30
सातारा : जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाशी निगडित प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावू, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य ...

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू
सातारा : जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाशी निगडित प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावू, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांनी दिली.
सेवानिवृत्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची पेन्शन सेवानिवृत्त तारखेस द्यावी, प्रत्येक वर्षी गट विमा खाते उतारा मिळावा यासह इतर मागण्यांचे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मंगळवारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांना देण्यात आले. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक भुजबळ, सरचिटणीस उद्धव पवार, नेते गणेश जाधव, बसवराज दोडमनी, रजनी चव्हाण, संतोष लोहार, राजेंद्र भुजबळ, कोरेगाव तालुकाध्यक्ष विजयकुमार भुजबळ आदी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षकांचे पगार व सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन महिन्याच्या १ तारखेला जमा करावी, जे शिक्षक मयत झाले त्यांच्या वारसांना गटविमा रक्कम त्वरित मिळावी. गटविमा प्रस्ताव सादर करताना १९९० पासूनची पगारपत्रकाची करत असलेली मागणी बंद करावी. अंशदायी पेन्शन योजनेतील प्राथमिक शिक्षकांना दरवर्षी खाते उतारा मिळावा. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या प्राथमिक शिक्षकांची आधी सेवेत असलेल्या जिल्ह्यातील अंशदायी खाती संबंधित शिक्षकांच्या खात्यावर वर्ग करावीत. शिक्षकांचे गटविमा खातेक्रमांक लवकरात-लवकर मिळावेत आदी मागण्या तात्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या अर्थ विभागाशी निगडित मागण्या तात्काळ पूर्ण करू, असे आश्वासन यावेळी विकास सावंत यांनी दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक भुजबळ यांनी दिली.
फोटो
सातारा- मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांना निवेदन देताना दीपक भुजबळ, उद्धव पवार, बसवराज दोडमनी, विजयकुमार भुजबळ.