चला करूया संकल्प स्त्रीशक्तीच्या स्वाभिमानाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST2021-03-08T04:36:53+5:302021-03-08T04:36:53+5:30
विधात्याने संसाररूपी रथ एक अनमोल रत्न बनविले ते म्हणजे स्त्री. या रथाचे एक चाक स्त्री, तर दुसरे चाक पुरुष. ...

चला करूया संकल्प स्त्रीशक्तीच्या स्वाभिमानाचा
विधात्याने संसाररूपी रथ एक अनमोल रत्न बनविले ते म्हणजे स्त्री. या रथाचे एक चाक स्त्री, तर दुसरे चाक पुरुष. या दोन्ही चाकांतील समतोल साधण्यासाठी परमेश्वराने स्त्री ही शक्ती प्रदान केली आहे. पुरुषासारखी शारीरिक शक्ती स्त्रीपाशी नाही; पण अनेक सद्गुणांचे, भावनांचे भांडार तिच्याजवळ आहे. या रथासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. एक स्त्री अनेक नाती सांभाळत ती लीलया हा रथ ओढत असते. या गुणांच्या जोरावर आंतरिक शक्तीच्या सामर्थ्यावर जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी या महान स्त्रियांनी इतिहास घडविला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या महान स्त्रियांनी इतिहास घडविला आहे. या महान स्त्रियांकडे फक्त इतिहास म्हणून न पाहता त्यांनी घालून दिलेल्या परंपरा, नैतिक तत्त्व, केलेला त्याग याचा विचार आधुनिक तंत्रज्ञानाच्या २१ व्या शतकात आपण नक्कीच केला पाहिजे.
मोबाईल, इंटरनेट, झपाट्याने बदलणारे हे जग नक्की कुठे जाऊन थांबेल, असा प्रश्न मला नेहमी पडतो. तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा सकारात्मकदृष्ट्या योग्य वापर करणे काळाची गरज होऊन बसली आहे. हल्ली सदैव अपडेट असणाऱ्या या समाजात परंपरा, तत्त्व, त्याग, आदर, प्रेम, आपुलकी या गोष्टी अमलात आणायच्या सोडा, त्यांचा विचार करायलाही कोणाकडे वेळ नाही आणि वेळ असलाच तर आधुनिकतेकडे मन या गोष्टी करायला धजावत नाही. नाव, पैसा, प्रतिष्ठा यांच्या हव्यासापुढे चारित्र्याची किंमत मोजायला संस्कार पायदळी तुडविताना आज कसलीच तमा बाळगली जात नाही. या गोष्टी पाहताना, ऐकताना, वाचताना मन सुन्न होऊन जात आहे. हे कुठे तरी थांबायला पाहिजे, नव्हे हे थांबलेच पाहिजे. यासाठी स्त्रियांनी संघटित होऊन लढायला हवे. कौटुंबिक संरचनेत आजी, पंजीने आपल्याला शिकवलेल्या परंपरा, अनेक मूल्ये, सांस्कृतिक सण यांची आधुनिकतेबरोबर सांगड घालून हा संसाररूपी रथ आदर्श पद्धतीने चालवायचा प्रयत्न करूया. स्त्रियांनी यशाची सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली असून, आधुनिक स्त्री ही स्वावलंबी व आत्मनिर्भर आहे. जागतिक महिला दिवशी सर्व ज्येष्ठ, आदर्श महिलांना अभिवादन करून हा दिवस आनंदाने साजरा करूया स्त्री शक्तीच्या सन्मानाचा संकल्प..!
-पांडुरंग भिलारे,
वाई प्रतिनिधी