चला रे चला... हळद काढाया चला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:27+5:302021-02-08T04:34:27+5:30

सातारा तालुक्यातील धावडशी परिसरात सध्या हळदी काढणीच्या कामाने वेग घेतला आहे. बहुतांश ठिकाणी घरातील सदस्यच या कामात मग्न असून ...

Let's go ... let's take out the turmeric! | चला रे चला... हळद काढाया चला!

चला रे चला... हळद काढाया चला!

सातारा तालुक्यातील धावडशी परिसरात सध्या हळदी काढणीच्या कामाने वेग घेतला आहे. बहुतांश ठिकाणी घरातील सदस्यच या कामात मग्न असून शेतशिवार फुलले आहे. ‘चला रे चला, हळद काढाया चला’ असा सूर ऐकू येत आहे.

००००००

ऊस पेटल्याने नुकसान

सातारा : सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी ऊस पेटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यातील अनेक घटना वीज वितरण कंपनीच्या तारांमधून ठिणग्या उडाल्यामुळे घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतो.

००००००

ऊस हंगाम जोमात

सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागात ऊस हंगाम जोमात सुरू असून उसाची वाहतूक जोरात सुरू आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक केली जाते. यामुळे सर्वच प्रमुख मार्गावरून ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र, त्यातील अनेक ट्रॅक्टरचालक योग्य ती काळजी घेत नाहीत. रिकामा ट्रॅक्टर जोमात पळवत असतात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

००००००

एटीएममध्ये गैरसोय

शिरवळ : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका कमी झालेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते. बँकांमध्ये प्लास्टिक कागदाचे पडदा तयार केले आहेत. मात्र एटीएममध्ये म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका संभवत असतो.

०००००००००००

सरपंचपदाची चर्चा

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका काही दिवसांपूर्वीच झाल्या असून सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. मात्र, ज्या गावात सरपंच पदाचे आरक्षण असलेले ग्रामपंचायत सदस्यच निवडून आलेले नाही. अशा गावांमध्ये आगामी सरपंचाबाबत चर्चा रंगालयला लागली आहे.

०००००००

अपंग निधीची मागणी

सातारा : सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत अपंग कल्याण निधी वाटपात दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे अपंग कल्याण निधी संबंधित पात्र लाभार्थ्यांना वेळेत मिळावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

००००००

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

सातारा : साताऱ्यातील अनेक भागात भुरट्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पूर्वीच्या काळी चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे होते. त्यामुळे नागरिकांवर वचक असायचा. मात्र, आता संबंधित सीसीटीव्ही कॅमेरे गायब झाल्यामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. ती रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बदलण्याची गरज आहे.

०००

सोनसाखळी चोरी

सातारा : कऱ्हाड येथील बसस्थानकात लहान- मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीस गेली होती. अनेकांना गावी जाण्याची घाई असते. त्यामुळे पोलिसांत नोंदही केली जात नाही. संबंधितांना आळा घालण्याची गरज आहे.

०००००००००

वाहतूक धोक्याची

सातारा : सातारा- सोलापूर मार्गावरील वर्धनगड घाटातून ऊस वाहतूक सध्या जोमात सुरू आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर सुसाट पळवत असतात. उतारावरून येणाऱ्या ट्रॅक्टरला रस्ता देताना घाट चढत असलेल्या अवजड वाहनचालकांची गोची होत असते. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

००००००००

खेळणी मोडलेली

सातारा : साताऱ्यातील बहुतांश बागा कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून बंद अवस्थेत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत उगवलेले आहे. तसेच अनेक बागांमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावर पालकच बसत असल्याने त्यांची मोडतोड झाली आहे. या खेळण्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

००००००

घंटागाडी येईना

सातारा : साताऱ्यातील विलासपूर परिसरात अनेक दिवसांपासून घंटागाडी येत नाही. तसेच गडकर आळीतही काही दिवसांनंतर दुपारी घंटागाडी येत असते. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळेत गाडी सोडण्याची मागणी होत आहे.

००००

ज्वारीचे पीक जोमात

खटाव : खटाव तालुक्यातील अनेक भागांत ज्वारीचे पीक जोमात असून कणसेही चांगली आहेत. गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. ज्वारीच्या कणसांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

००००

नोटा स्वीकारण्यावरून गोंधळाचे वातावरण

सातारा : साताऱ्यातील अनेक व्यापारी पाच रुपयांच्या नोटा स्वीकारत नाहीत. आठवडा बाजारात तर ‘पाचच्या नोटा बंद झाल्या असल्याचे’ व्यापारी बिनधास्त सांगत असतात. तसेच सध्या दहा रुपयांच्या नोटा बाजारात वाढल्या आहेत. त्याही खराब झालेल्या असल्याने नोटा स्वीकारण्यावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत योग्य तो खुलासा करण्याची मागणी केली जात आहे.

०००००००

ऑनलाइन फसवणूक

सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेकांना मोबाइलवरून ‘लॉटरी लागली आहे. एवढी रक्कम भरल्यास पूर्ण रक्कम मिळेल’ असा मेसेज पाठविला जात आहे. त्यातून ऑनलाइन फसवणूक होत असल्याचा धोका वाढला आहे. या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले जात आहे.

००००००

आठवडा बाजारात गर्दी

सातारा : साताऱ्यातील जुन्या मोटार स्टॅण्ड परिसरात दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी भाजी विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, अनेक जण कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत नाहीत. अनेक जण गर्दीमध्येही विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे.

०००००

ऊस वाहतुकीमुळे बैलांचे हाल

सातारा : जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीतून ऊस वाहतूक केली जाते. मात्र, ट्रॅक्टर रोडवर थांबविला जातो. तो फडापर्यंत जात नाही. फडापासून ट्रॅक्टरपर्यंत बैलगाडीतून ऊस आणला जातो. त्या ठिकाणी कित्येक तास बैलांना वजन खांद्यावर घेऊन उभे राहावे लागत आहे. ट्रॅक्टरवर मोळी टाकताना अवघड जात असल्याने अनेक जण त्यात उभे राहून काम करतात. यामुळे बैलांचा छळच होत असल्याचे समोर येत आहे.

Web Title: Let's go ... let's take out the turmeric!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.