पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास पठारावर पर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने पर्यटक कासला भेट देत आहेत. पठारावरील विविधरंगी फुलांचे गालिचे असणाऱ्या फुलांच्या गावी अर्थात कास पठारावर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
कास-महाबळेश्वर राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढऱ्याशुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने पायी चालत याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फुलांची पर्वणी स्वानुभवताना दिसतात. पठारावर सतत पर्यटकांची रेलचेल सुरू असून, ठिकठिकाणी गाईड पर्यटकांना येथील दुर्मीळ फुलांचे व वनस्पतींसंदर्भात पर्यटकांना मार्गदर्शन करीत आहेत. पठारावरील जैवविविधता पाहता, कास पठाराची ख्याती जगभर पसरलेली आहे. जिल्ह्याला लाभलेले कास पठार हे निसर्गाचे वरदान आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.
(कोट)
कास पठार म्हणजे निसर्गत: आपल्यासाठी जणू स्वर्गच होय. येथील पर्वणीचा स्वानुभव कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आहे. येथील पर्यावरणाला, नाजूक, दुर्मीळ फुलांना कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. तसेच येथील पर्यटनस्थळाचा वारसा जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
-विश्वराज पवार, पर्यटक, पुणे
(कोट २)
कास पठारावरील विविधरंगी व दुर्मीळ फुले पाहत असताना पायदळी तुडवली जाणार नाहीत, याची पर्यटकांनी काळजी घेऊन येथील निसर्गसौंदर्याचा वारसा जपावा. सध्याचे फुलांचे फ्लॉवरिंग पाहता, पन्नास ते साठ टक्के पठार फुलांनी बहरले आहे. येत्या चार दिवसांत पठारावर तेरड्याची लाल झालर पाहावयास मिळेल.
मारुती चिकणे, अध्यक्ष, कास पठार कार्यकारिणी समिती
फोटो...
(छाया-सागर चव्हाण)