मातंग समाजाच्या पाच टक्के स्वतंत्र आरक्षणासाठी लढा उभारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:43 IST2021-09-23T04:43:58+5:302021-09-23T04:43:58+5:30
कऱ्हाड : अनुसूचित जातीतील जे राखीव आरक्षण आहे त्यामधील मातंग समाजाच्या पहिल्यापासूनच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीत म्हणावा ...

मातंग समाजाच्या पाच टक्के स्वतंत्र आरक्षणासाठी लढा उभारू
कऱ्हाड : अनुसूचित जातीतील जे राखीव आरक्षण आहे त्यामधील मातंग समाजाच्या पहिल्यापासूनच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीत म्हणावा तसा बदल व प्रगती झालेली दिसून येत नाही. याबद्दल वारंवार आंदोलने झाली. तरीपण अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभ मातंग समाजाला म्हणावा तसा मिळालेला नाही. ही समाजाच्या दृष्टिकोनातून भविष्याचा आणि वर्तमानाचा विचार करता खूप गंभीर बाब आहे. यापुढे जर अनुसूचित जातीतील मातंग समाजाला असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करून जर स्वतंत्र पाच टक्के आरक्षण जातनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात अ ब क ड असे वर्गीकरण करून दिले गेले नाही, तर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली राज्यभर टोकाचा लढा उभारू, असा गंभीर इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार समितीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हणाले आहे की ,मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून नाजूक होती. त्यामुळे आरक्षणातील नोकरीचा लाभ मिळत असताना जे काही तोडपाण्याचे व्यवहार झाले ते समाजाला जमले नाहीत. त्यामुळे नोकरीतील आमचं आरक्षण थोरला आणि धाकटा भाऊ यांनीच घेतल्यामुळे मातंग समाज आहे त्याच अवस्थेत राहिला. शिवाय मातंग समाजातील ज्यांनी राजकारणात समाजाचा वापर करून सत्तेतील पदे भोगली त्यांनी समाजाच्या विकासापेक्षा स्वतःचं भलं करून घेण्यातच व राजकीय नेत्यांचे तळवे चाटण्यात धन्यता मानली.
आता मातंग समाज एकविसाव्या शतकामध्ये वावरतोय. समाजातील तरुणांना याची चांगली जाण आहे. त्यामुळे भविष्यकाळामध्ये पुरोगामी संघर्ष परिषद अनुसूचित जातीतील लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला स्वतंत्र पाच टक्के आरक्षण मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यासाठी आम्ही समाजाचे प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रभर मातंग समाज आरक्षण प्रबोधन यात्रा काढणार असल्याचेही त्यांनी पत्रकात सांगितले आहे.