महिलांनाही माहिती असू द्या आर्थिक व्यवहाराची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:35+5:302021-08-28T04:43:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तुला काहीही कमी पडू देणार नाही म्हणत महिलांना कायम सुरक्षित वातावरण देऊन त्यांना व्यवहारातून ...

Let women know about financial transactions | महिलांनाही माहिती असू द्या आर्थिक व्यवहाराची माहिती

महिलांनाही माहिती असू द्या आर्थिक व्यवहाराची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तुला काहीही कमी पडू देणार नाही म्हणत महिलांना कायम सुरक्षित वातावरण देऊन त्यांना व्यवहारातून बाहेरच ठेवण्यात अनेकांना सुख दिसलं. पण जोडीदाराच्या या सुखाच्या कल्पनेची बोच त्यांच्या पश्चात महिलांना कुट्ट अंधार दिसू लागल्याने आपल्या किमान व्यवहारांची माहिती जोडीदाराला देणे किती महत्त्वाची आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

कोविड काळात अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात हे अवघं कुटुंब अत्यंत विस्कटलेल्या परिस्थितीत रहात आहे. बोटावर मोजण्या इतपतच कुटुंबप्रमुखांनी आपल्या व्यवहारांची माहिती पत्नीला न दिल्याचे समोर आले आहे. पती विरहाच्या दु:खातून सावरलेल्या महिलांपुढे देणेकरी येऊन बसल्याने काय बोलावं या पेचात त्या सापडल्या आहेत. सामान्य कुटुंबापेक्षाही शिकलेल्या आणि आर्थिक सुबत्ता असलेल्या कुटुंबांमध्ये हे प्रकार अधिक आढळतात.

जोडीदाराला हे माहीत असलंच पाहिजे

आपली गुंतवणूक कुठं आहे

कोणाला आपण आणि कोण आपल्याला किती पैसे देणं आहे

लॅपटॉप, मोबाईल, लॉकर्स, एटीएम कार्डचे पासवर्ड

महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाईल्सची ठिकाणं

मोठ्या व्यवहारातील आपली आर्थिक भूमिका

का नसते माहिती

समाज कितीही पुढारलेला असला तरी अद्यापही बहुतांश घरांमध्ये आर्थिक व्यवहाराच्या बाबत महिला बॅकफूटवर आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे पुरुषांकडून पुरुषांकडेच घराचे व्यवहार हाताळणे हे आहे. घरातील करता पुरुष म्हणून पती आणि त्याच्यानंतर मुलाकडे आर्थिक जबाबदारी पेलायला येते. त्यामुळे महिलांची भूमिका आणलेलं शिजवा, खायला घाला आणि समारंभांमध्ये मिरवा इतक्यासाठीच सीमित आहे.

माहिती देणं का टाळलं जातं?

पुरुषसत्ताक व्यवस्थेचे बळी असलेल्या अनेक कुटुंबांमध्ये अद्यापही पुरुषांच्या हातातच आर्थिक सत्ता आहे. नोकरी करणाऱ्या महिलांचे एटीएम कार्डही पतींच्या ताब्यात असल्याने आर्थिक स्वावलंबन ही संकल्पनाच या महिलांच्या गावी नाही. दुसरं व्यवहार करताना पुरुष डोक्याने तर महिला मनाने विचार करतात, असे मानले जाते. आर्थिक व्यवहार कशाशी खातात हेच महिलांना माहीत नसल्याने ऐनवेळी निर्णय घेताना चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे एखाद्या व्यवहारात काही चूक झाली तर त्याचे टोमणे त्यांना आयुष्यभर ऐकावे लागतात.

महिलांना कशाची असते माहिती

माहेर सासरचे नातेवाईक

मुलांचा अभ्यास

क्लासच्या वेळा

घरातील साहित्य

आप्तांचे आजारपण

हे करणं आवश्यक!

अनेक कुटुंबांमध्ये माझ्यानंतर माझा मुलगा कुटुंब सांभाळणार आणि तो मोठा होईपर्यंत मला मरण येणार नाही अशा विश्वास पुरुष वावरत असतात. वास्तविकपणे कुटुंबाच्या प्रत्येक व्यवहाराची माहिती पत्नीसह त्याचे जवळचे मित्र किंवा एखाद्या नातेवाइकाला ज्ञात असणे आवश्यक आहे. अनावधानाने कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला तर परस्परांना विचारून ते मार्ग काढू शकतात. पत्नीला आर्थिक स्वावलंबी बनवणं आणि व्यवहारिक स्वातंत्र्य देणंही अपेक्षित आहे.

कोट

अंगावर ब्रॅण्डेड कपडे, फिरायला गाडी, पर्समध्ये क्रेडिट कार्ड म्हणजे स्वयंपूर्णता किंवा स्वातंत्र्य आणि सक्षमीकरण नाही, हेच महिलांच्या गावी नाही. अनेकदा डोक्याला व्याप नको म्हणून महिलाच याची माहिती घेण्याचं टाळतात. पण जोडीदाराच्या मृत्यूनंतर मात्र कायदेशीर प्रसंग उभे राहून सगळंच होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळे आपल्या भविष्यासाठी म्हणून कुटुंबाचे व्यवहार पती-पत्नी यासह तरुण मुलांनाही सांगणं आवश्यक आहे.

- ॲड. मनीषा बर्गे, सातारा

Web Title: Let women know about financial transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.