देवस्थानचा खजिना कोरोना लढ्यासाठी होऊ द्या रिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:39 IST2021-05-19T04:39:27+5:302021-05-19T04:39:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : कोरोना महामारीने राज्यासह सातारा जिल्ह्यात थैमान घातले असून, कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्ह्यात आरोग्य सुविधा अपुऱ्या ...

देवस्थानचा खजिना कोरोना लढ्यासाठी होऊ द्या रिता
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : कोरोना महामारीने राज्यासह सातारा जिल्ह्यात थैमान घातले असून, कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्ह्यात आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वसामान्य कोरोनाबाधितांच्या आरोग्याची काळजी घेणे शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर गेले आहे. देवस्थानला लोकवर्गणीतून लाखो रुपये निधी जमा होत असतो. लोकांसाठी देव आहे तर मग संकटकाळात देवस्थानचा खजिना लोकांसाठी रिता झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.
कोरोनाचा समाजातील प्रत्येक घटकाला फटका बसला असून, अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वच कोविड सेंटरवर ताण वाढला आहे . कोरोना बाधित रुग्णांसाठी बेड व औषधे मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासकीय कोरोना केअर सेंटर सुरू आहेत, तीसुद्धा आता कमी पडू लागली आहेत. त्यामुळे गावोगावी आरोग्य विभाग व आपत्ती व्यवस्थापन समित्यांनी एकत्र येत कोरोनाबाधित रुग्णांसाठी शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. मात्र, हे कक्ष चालवतानादेखील आर्थिक टंचाईमुळे संयोजकांची दमछाक होत आहे.
सातारा जिल्ह्यात भाविक भक्तांच्या वर्गणीतून व दानपेटीतून अनेक नामांकित देवस्थाने श्रीमंत झाली आहेत. तसेच गावोगावीदेखील अनेक छोटी-मोठी देवस्थाने आहेत. यातील अनेक देवस्थानांनी कोरोनाच्या महामारीमधे गरजूंना व कोरोनाबाधितांना मदत केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येदेखील काही देवस्थाने मदत करत आहेत. मात्र, आता शासकीय यंत्रणा तोकडी पडत असताना सर्वच देवस्थानांनी कोरोना बाधित रुग्ण, विलगीकरण कक्ष, कोरोना केअर सेंटरला लागेल ती मदत करण्यासाठी ‘कमी तिथं आम्ही’ ही भूमिका घेऊन पुढे येणे गरजेचे आहे.
(चौकट)
.. तरच गावे अन् माणसे वाचतील
ग्रामदैवतांच्या यात्रांवर खर्च होणारा पैसा कोरोनाला रोखण्यासाठी अथवा गावातील कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी खर्च करणे गरजेचे आहे. गावातील लोकांचा पैसा गावातील लोकांसाठी, कोरोना बाधितांवर उपचारासाठी खर्च केला तरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावे व माणसे वाचणार आहेत. शासन कोरोना काळात गावासाठी सर्व उपाययोजना करण्यासाठी काम करणे गरजेचे बनले आहे.
(चौकट)
कळस नको... रुग्णालयाची पायाभरणी हवी
देवाबद्दलची श्रद्धा आणि भावना यापोटी भाविक लाखो रुपयांची देणगी मंदिरात दान करीत असतात. त्याचा लोकांच्या सुविधेसाठी किती उपयोग होतो, हा संशोधनाचा भाग आहे . लोकांच्या देणगीवर देवाच्या गाभाऱ्यातच हात मारणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे आजच्या कठीणप्रसंगी खरी गरज आरोग्याची आहे. त्यामुळे लोकांनी यापुढे मंदिराचे कळस बांधण्यासाठी देणगी न देता शासकीय रुग्णालयांना सुविधा पुरवणे, नवीन रुग्णालय उभारण्यासाठी देणगी देण्याची गरज निर्माण झाली आहे.