विद्यार्थ्यांच्या पुस्तकांमुळं गटशिक्षणाधिकाऱ्यांना ‘धडा’
By Admin | Updated: July 15, 2016 22:38 IST2016-07-15T21:53:52+5:302016-07-15T22:38:17+5:30
तब्बल महिन्यानंतर पुस्तके हातात : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संबंधितांना तत्काळ नोटीस--लोकमतचा दणका!

विद्यार्थ्यांच्या पुस्तकांमुळं गटशिक्षणाधिकाऱ्यांना ‘धडा’
नितीन काळेल --सातारा -शाळा सुरू होऊन तब्बल एक महिना झाला तरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तकच मिळाले नाही, हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी संबंधित तालुक्यातील चार गटशिक्षणाधिकाऱ्यांना खुलासा करण्याची नोटीस पाठविली आहे. याप्रकरणात संबंधितांनी पुस्तकाची आॅनलाईन मागणीच केली नसल्याचे कारण पुढे आले आहे.
दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, लवकरच सर्व पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत.
याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. शाळा सुरू होण्यापूर्वी तशी मागणी करणे आवश्यक असते. तरच शाळा भरताना ही पुस्तके संबंधित शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात; मात्र यावर्षी सातारा जिल्ह्यात पुस्तके मिळाली. पण, चार तालुक्यांत तीन वर्गांची हिंदी विषयाची पुस्तके मिळाली नाहीत. याबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतली. त्यानंतर पुस्तके न मिळण्यामागचे कारण समोर आले.
तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत किती विद्यार्थी आहेत, किती पुस्तकांची आवश्यकता आहे, त्याची आकडेवारी घेऊन आॅनलाईन मागणी करावी लागते. यावर्षी कऱ्हाड, पाटण, खटाव आणि खंडाळ्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी प्रथमदर्शनी पाचवी, सहावी आणि सातवीच्या हिंदी सुलभभारती या विषयाच्या पुस्तकांची मागणी केली नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांना आढळून आले. त्यांनी चार तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना सात दिवसांत खुलासा करा, अशा आशयाचीच नोटीस काढली आहे. त्यानंतर देशमुख यांनी या प्रकरणात संबंधितांशी चर्चा करून पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत कशी लवकर पोहोचतील, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर गुरुवारीच एक वाहन पुस्तके आणण्यासाठी कोल्हापूर येथे गेले होते. त्यामुळे महिन्यानंतर हातात हिंदी विषयाचे पुस्तक पडत आहे.
पुस्तके न मिळालेले विद्यार्थी...
चार तालुक्यांतील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत. यामध्ये पाचवी १५ हजार ८६५, सहावी ८ हजार ७३१ आणि सातवी ५ हजार ८४९ असे विद्यार्थी आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना दोन दिवसांत पुस्तके मिळतील, अशी व्यवस्था केली आहे.
काही ठिकाणी पुस्तके मिळाली...
मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्या कार्यवाहीनंतर शुक्रवारी खटाव आणि पाटण तालुक्यांत पाचवीची हिंदी विषयाची पुस्तके प्राप्त झाली आहेत. तर कऱ्हाड तालुक्यात पुस्तके पोहोच करण्याची कार्यवाही सुरू होती, अशी माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याचे वृत्त मी ‘लोकमत’मध्ये वाचले. त्यानंतर माहिती घेतली असता संबंधितांनी हिंदी विषयाच्या पुस्तकांची आॅनलाईन मागणी केली नसल्याचे समोर आले. त्यामुळे चार गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस काढली आहे. येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील.
- राजेश देशमुख,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद