शासन देणार गृहिणींना अन्न साक्षरतेचे धडे
By Admin | Updated: December 4, 2014 23:42 IST2014-12-04T23:19:37+5:302014-12-04T23:42:11+5:30
स्वच्छ, निर्भेळ आहारासाठी उपक्रम

शासन देणार गृहिणींना अन्न साक्षरतेचे धडे
सातारा : प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि निर्भेळ अन्न मिळण्याचा हक्क आहे. सकस अन्न घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून गृहिणींना आता अन्न साक्षरतेचे धडे मिळणार आहेत.
प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि निर्भेळ अन्न मिळण्याचा हक्क आहे. निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे ही अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी गृहिणींना अन्न साक्षर करण्यासाठी स्वच्छ व आरोग्यदायी स्वयंपाकघर अभियान या डिसेंबर महिन्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत गृहिणींना अन्न सुरक्षेबाबत साक्षर केल्यास त्यांच्यात जागरुकता निर्माण होईल. आजच्या गतिमान जीवनात चांगला आहार मिळणे गरजेचे आहे. प्रत्येकाला सकस आणि निर्भेळ अन्न मिळाल्यास खराब अन्नातून होणाऱ्या आजारांना आळा बसेल.
हे अभियानात आपल्या संघटनेतील सदस्यांकरिता राबविण्यासाठी दिवस, वेळ व स्थळ याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सातारा कार्यालयास कळवावी, असे आवाहन सहायक आयुक्त आर. एस. बोडके यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
भेसळ ओळखा...
प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या या महाअभियानात गृहिणींना अन्नाबाबतची सर्वसाधारण रूपरेषा, संतुलित आहार, सुरक्षित अन्न, अन्न भेसळीचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, सुरक्षित अन्नासाठी घ्यावयाची काळजी, स्वच्छ व आरोग्यदायी स्वयंपाकघर, अन्नातील भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.