वनविभागाकडून बिबट्याची शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:51+5:302021-09-02T05:24:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी रात्री काही लोकांनी बिबट्या पाहिला होता. वनविभागाने बिबट्याची शोधमोहीम केली, ...

वनविभागाकडून बिबट्याची शोधमोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी रात्री काही लोकांनी बिबट्या पाहिला होता. वनविभागाने बिबट्याची शोधमोहीम केली, मात्र मंगळवारी सकाळी चार तास शोधूनदेखील बिबट्या आढळून आला नाही. संबंधित बिबट्या आल्या मार्गाने निघून गेला असावा, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये सोमवारी रात्रीच्या वेळेस बिबट्याचा वावर आढळून आला. प्रत्यक्षदर्शी लोकांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली. वनविभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये कॅमेरे बसवले असून, बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला. मात्र उशिरापर्यंत बिबट्याचा शोध लागू शकला नाही.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. याच परिसरात भटक्या श्वानांचा तसेच डुकरांचा वावरदेखील आहे. अजिंक्यतारा परिसरामध्ये वावर असणारा बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ या परिसरात आल्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी हा बिबट्या दिसून आल्याने काही लोकांनी वनविभागाला याची कल्पना दिली. यानंतर वन कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. बिबट्याचे फग मार्क घेण्यात आले. ते आढळून आले असल्याने वनविभागातर्फे कॅमेरे लावण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या जंगलामध्ये वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बॅटऱ्या घेऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या रात्री उशिरापर्यंत आढळून आला नाही. मंगळवारी सकाळपासून वनविभागाने बिबट्याला शोधण्याची मोहीम सुरू केली. वन कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर पिंजून काढला. अजिंक्यतारा किल्ल्यावरून वाहत येणारा सोळाचा ओढा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून वाहतो. या ठिकाणीदेखील पाहणी करण्यात आली. मात्र बिबट्या निघून गेल्याचे लक्षात आले. अजिंक्यतारा यवतेश्वर खास असा बिबट्याचा भ्रमण मार्गदेखील आहे. याच परिसरातील बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ शहरात आल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.
कोट...
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये नाईट व्हीजन कॅमेरे लावण्यात आले आहेत. बिबट्या हा आल्या मार्गे परत गेला असावा. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. बिबट्या किंवा कोणताही जंगली प्राणी दिसल्यास नागरिकांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
- डॉ. निवृत्ती चव्हाण, वन अधिकारी