बछड्यांना जन्म दिलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:41 IST2021-04-20T04:41:11+5:302021-04-20T04:41:11+5:30
साजूर येथील ‘गारवडे वडा’ नावच्या शिवारात मादी बिबट्याने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतकरी ...

बछड्यांना जन्म दिलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ला
साजूर येथील ‘गारवडे वडा’ नावच्या शिवारात मादी बिबट्याने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतकरी हंबीरराव ज्ञानदेव चव्हाण हे शिवारात गेले होते. त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसला. त्यांनी चाहूल न लागता तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याने त्यांच्या दिशेने झेप घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केला. हंबीरराव चव्हाण यांनी हातात असलेले खुरपे उगारल्यानंतर बिबट्या मागे सरकला. त्यानंतर जीवाच्या आकांताने त्यांनी त्या बिबट्याचा हल्ला परतवून लावला. बिबट्या निघून गेल्यानंतर हंबीरराव यांनी गावात धाव घेऊन याबाबतची माहिती अन्य शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर तेथे चार ते पाच शेतकरी शिवारात गेले. त्यावेळी दादासाहेब चव्हाण यांच्या शेताच्या कडेला एका मादी बिबट्याने दोन बछड्यांना जन्म दिल्याचे त्या शेतकऱ्यांनी पाहिले. मात्र, शेतकरी त्याठिकाणी पोहोचताच सागर चव्हाण यांच्यासह अन्य शेतकऱ्यांवर त्या बिबट्याने झेप घेतली. त्यामुळे सर्वजण तेथून पळाले. काही वेळाने अन्य काही शेतकरी शेतातून घरी येत असताना झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने शेतकरी बचावले.
घटनेची माहिती मिळताच वनपाल शंकर राठोड, अरुण शिबे, मयूर जाधव, मंगेश वंजारे, उपसरपंच संदीप पाटील, प्राणीमित्र रोहित कुलकर्णी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी बिबट्या व बछड्यांच्या शोधार्थ मोहीम राबवली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. दरम्यान, या घटनेत शेतकऱ्यांना फारशी दुखापत झाली नसली तरी दहशत निर्माण झाली आहे.
फोटो : १९केआरडी०४
कॅप्शन : साजूर (ता. कऱ्हाड) येथील शिवारात बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (छाया : दीपक पवार)