सांबरवाडीत वृद्धावर बिबट्याचा हल्ला
By Admin | Updated: October 25, 2015 23:33 IST2015-10-25T22:47:27+5:302015-10-25T23:33:45+5:30
गंभीर जखमा : रानात गवत कापताना झुडपातून येऊन मारली झडप; यवतेश्वर डोंगरावरील गावे भयभीत

सांबरवाडीत वृद्धावर बिबट्याचा हल्ला
सातारा : गवत कापायला रानात गेलेल्या वृद्धावर बिबट्याने अचानक समोरून हल्ला केल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला. साताऱ्यापासून अवघ्या चार किलोमीटरवर असलेल्या सांबरवाडी या डोंगरावरील गावात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हे थरारनाट्य घडले.गणपत अण्णा भणगे (वय ७०, रा. सांबरवाडी, ता. सातारा) असे गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते गावाजवळील काळसरी नावाच्या रानात गवत कापण्यासाठी गेले होते. गवत कापत असतानाच झुडपातून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक समोरून हल्ला केला. भणगे यांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला; मात्र या झटापटीत त्यांचे डोके, खांदे, छाती, हात आणि पायावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या.
थोड्या वेळाने बिबट्या तिथून निघून गेला आणि ग्रामस्थांनी भणगे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले तेव्हा साडेसहा वाजून गेले होते. भणगे यांच्यावर तातडीने उपचारास प्रारंभ करण्यात आला. त्यांच्या डोक्यावरील व खांद्यावरील जखमा गंभीर स्वरूपाच्या आहेत.
दरम्यान, हे वृत्त समजताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे तसेच वन विभागाचे कर्मचारी तातडीने जिल्हा रुग्णालयात पोहोचले. उपचारांनंतर भणगे यांना तातडीने आर्थिक भरपाई दिली जाईल, असे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले.
यवतेश्वर, सांबरवाडी, गवडी, महादरे, अंबेदरे परिसरात बिबट्याचा वावर पूर्वीपासूनच आहे. बिबट्याचा भ्रमणमार्ग या डोंगरांना व्यापून राहिला आहे. त्यामुळे ऐनवेळी उद््भवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम करण्याची गरज असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले
आहे. (प्रतिनिधी)
मानव-वन्यजीव संघर्षाच्या दिशेने...
सातारा शहर सात डोंगरांनी वेढले आहे. त्यातील अनेक डोंगरांवर बिबट्याचा वावर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. बिबट्या सहजासहजी माणसावर हल्ला करीत नसला तरी अशा घटनांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, वनविभागाने तातडीच्या उपाययोजना तसेच बिबट्याप्रवण क्षेत्रात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.