कायदा पायदळी... मैला डोक्यावरच !
By Admin | Updated: August 10, 2015 00:04 IST2015-08-10T00:04:29+5:302015-08-10T00:04:29+5:30
अमानवी परंपरा कायम : सदर बझारमध्ये धक्कादायक वास्तव उघड

कायदा पायदळी... मैला डोक्यावरच !
प्रदीप यादव/जावेद खान- सातारा -शौचालयातील मैला हाताने उपसणे, तो डोक्यावर घेऊन वाहणे अमानवी आहे. म्हणूनच त्या विरोधात कायदा करण्यात आला. मात्र, तो धाब्यावर बसवून सातारा शहरातील सदर बझार येथील सार्वजनिक शौचालयाची टाकी पालिकेच्या ठेकेदाराने मोटार न लावता कामगारांकडून साफ करवून घेतल्याचे उघड झाले आहे.
या संदर्भात पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करून अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने पालिकेचा ठेकेदारधार्जिणा कारभार चव्हाट्यावर आला आहे.सदर बझार येथील नवीन भाजीमंडईनजीक महिलांसाठी चार आणि पुरुषांसाठी चार असे आठ सीटचे सार्वजनिक शौचालय आहे. अनेक वर्षांपासून शौचालयाची टाकी साफ केली नव्हती. दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या ठेकेदाराने टाकी साफ करण्याचे काम सुरू केले होते. वास्तविक, टाकीतील मैला साफ करण्यासाठी सक्शन गाडीच्या मोटारीचा वापर करायला हवा होता. मात्र, ठेकेदाराने पाच ते सहा कामगारांकडून हाताने काम करवून घेतले.
कामगारांनी टाकीतील मैला बादलीने उपसून टेम्पोत ठेवलेल्या बॅरलमध्ये ओतला. त्यानंतर तो मैला सोनगाव येथील कचरा डेपोत एका खड्ड्यात टाकण्यात आला. याबाबत भाग निरीक्षक दत्तात्रय रणदिवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे काही घडले असेल याबाबत माहिती नाही; पण शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. हे काम कसे करायचे ही त्यांची जबाबदारी आहे, असे उत्तर देऊन जबाबदारी झटकली. (प्रतिनिधी)
मैला हाताने साफ करणे किंवा डोक्यावरून वाहणे, हा गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी कायदा आहे. सदर बझार येथे ठेकेदाराने कामगारांकडून हाताने मैला उपसून घेतला, या घटनेबद्दल माहिती नाही; पण हा प्रकार गंभीर आहे. हे काम कोणाच्या देखरेखीखाली झाले? कुणी केले? अधिकारी कोण उपस्थित होते, याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
- सचिन सारस, नगराध्यक्ष