एलईडी दिवे, जनसेटवरून वाद
By Admin | Updated: November 7, 2015 23:40 IST2015-11-07T22:56:00+5:302015-11-07T23:40:01+5:30
सातारा पालिका सभा : ४१ पैकी ४० विषयांना मंजुरी

एलईडी दिवे, जनसेटवरून वाद
सातारा : सातारा पालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर शनिवारी पहिलीच सभा झाली. या सभेत विषयपत्रिकेवरील ४१ पैकी ४० विषयांना मंजुरी देण्यात आली तर एक विषय पुढील सभेवेळी पुन्हा मांडण्याचा निर्णय झाला. नूतन नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शहरातील बसविण्यात येणाऱ्या एलईडी दिवे आणि शाहू कला मंदिरातील जनसेटच्या निविदावरून सभा वादळी ठरली.
शाहू कला मंदिरातील जनसेटची निविदा मंजूर करण्यात आली तर एलईडी दिव्यांचा विषय पुढील सभेवेळी पुन्हा मांडण्याचा निर्णय झाला. विरोधी पक्षनेते अॅड.बाळासाहेब बाबर यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाची कानउघडणी केली तर नगरसेवक रवींद्र पवार आणि प्रवीण पाटील यांच्यात काही मुद्द्यांवर कलगीतुरा रंगला. वीज वापरामध्ये बचत करण्यासंबंधी आलेल्या निविदांबाबत चर्चा झाली. यावर अॅड. बाबर यांनी ‘हा अहवाल परिपूर्ण नाही. शहरात लाईटचे खांब किती, त्यावरील दिवे किती याबाबत कोणतेही आॅडिट नाही. एलईडीच्या फायदे- तोट्याचा अभ्यास नाही. ज्यांनी निविदा भरली आहे, त्यांनी यापूर्वी कुठे असे काम केले आहे का? त्याचा अहवाल नाही. त्याचबरोबर आता जे दिवे बदलण्यात येणार आहेत. त्याचे पुढे काय करणार,’ असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करण्यात आले.
उपनगराध्यक्ष जयवंत भोसले म्हणाले, ‘बाळासाहेब बाबर यांनी मांडलेले मुद्दे पडताळून पाहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी) निविदा मंजुरीवरून वाद
शाहू कला मंदिरासाठी जनरेटर खरेदी व बसविण्याबाबत आलेल्या निविदा मंजुरीवरून नगरसेवक प्रवीण पाटील, रवींद्र पवार, अॅड.बाळासाहेब बाबर यांच्यात वादविवाद झाला. यात माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेविका हेमांगी जोशी, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, अॅड. डी.जी. बनकर यांनीही भाग घेतला. प्रवीण पाटील म्हणाले, ‘शाहू कला मंदिरातील त्रुटीबाबत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलेल्या टीकेपैकी ८० टक्के वास्तव आहे. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांनी शाहू कला मंदिराची पाहणी करून त्रुटी दूर कराव्यात.