टेंभूचे पाणी मेरवेवाडी तलावात सोडा !

By Admin | Updated: March 9, 2016 01:15 IST2016-03-09T01:14:33+5:302016-03-09T01:15:08+5:30

पाणी टंचाई आढावा बैठक : कऱ्हाड तालुक्यातील तीव्र पाणी टंचाईच्या तेवीस गावांबाबत चर्चा

Leave the water of the tank in the Mervewadi lake! | टेंभूचे पाणी मेरवेवाडी तलावात सोडा !

टेंभूचे पाणी मेरवेवाडी तलावात सोडा !

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यामध्ये यावर्षी पन्नास टक्यांपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्या २३ गावांमध्ये अती तीव्र पाणी टंचाई असल्याने त्या गावांमध्ये तत्काळ पाणी पुरवठा करण्याबाबत निर्णय घेऊन तशा उपाय योजना करण्यात याव्यात. तसेच कऱ्हाड तालुक्यातील टेंभू योजना प्रकल्पातील पाणी मेरवेवाडी तलावात व उत्तरमांड योजनेतील प्रकल्पातून परिसरातील तलावात पाणी सोडल्यास पाणी टंचाईची समस्या कमी होईल. त्यासाठी तत्काळ या योजनेतील पाणी सोडण्याविषयी शासनाने परवानगी द्यावी, अशी पदाधिकाऱ्यांनी मागणी केली.
येथील कऱ्हाड पंचायत समितीमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी कऱ्हाड तालुका पाणी टंचाईची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, सभापती देवराज पाटील, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांची उपस्थिती होती.
कऱ्हाड पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एम. डी. आरळेकर यांनी तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनांच्या माध्यमातून तसेच चौदाव्या वित्त आयोगातून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या कामांची माहिती दिली. तसेच तालुक्यात २२२ गावे असून, १९८ ग्रामपंचायती आहेत. तर तालुक्याची ग्रामीणची लोकसंख्या ही ५ लाख ८४ हजार ८५ इतकी आहे. तालुक्यात सरासरी पर्जन्यमान हे ६३० मिली मीटर पैकी यावर्षी ३१६ मिली मीटर इतका म्हणजे पन्नास टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना या चार तर स्वतंत्र पाणी पुरवठा योजना २७२ आहेत. लघु नळ पाणी पुरवठा योजना या १५० आहेत. हातपंपांच्या संख्या ही १ हजार २४३ इतकी असल्याची माहिती उपअभियंता आरळेकर यांनी दिली.
यावेळी तहसीलदार राजेंद्र शेळके म्हणाले, ‘ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. त्या ठिकाणचे वीज कनेक्शन बंद करणेबाबत जिल्हाधिकारी यांचेकडून आदेश देणेत आलेले आहेत. त्यानुसार टंचाईग्रस्त गावांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन बंद करावे तसेच दुष्काळग्रस्त गावांतील थकित वीज बिलाचे कनेक्शन तोडू नये. या गावांमध्ये जास्तीत-जास्त जलयुक्त शिवार अभियानांतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.’
आढावा बैठकीदरम्यान वाघेरी, पाचुंद, मेरवेवाडी या गावांना पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भासत असल्याने याबाबत शासनाकडून योग्य त्या उपाययोजना आखणे गरजेच्या आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या मेरवेवाडीतील तलावात टेंभू जलसिंचन योजनेतील प्रकल्पातून पाणी सोडल्यास गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी सुटेल. त्यामुळे शासनाने या प्रकल्पातून तलावात पाणी सोडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी तिन्ही गावच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी केली. तसेच पाटण तालुक्यातील उत्तरमांड प्रकल्पातून उत्तरमांड नदीत पाणी सोडल्यास चाफळ, माजगाव, चरेगाव, कळंत्रेवाडी, भवानवाडी, खालकरवाडी या सहा गावांच्या पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी किवळ येथील गावाबाहेरील असलेल्या तलावात पाच टक्केच पाणी साठा शिल्लक राहिला असून, त्याबाबत लघूपाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती किवळ गावच्या सरपंचानी दिली. तर रिसवडला पाणीपुरवठा करण्यात येणारी पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी धोंडेवाडी, बेलवडे बुद्रुक, पवारवाडी, हरपळवाडी, हजारमाची, वाघेरी, शामगाव आदी गावांतील प्रलंबित पाणी पुरवठ्याच्या कामांविषयी चर्चा करण्यात आली.
बैठकीस २३ गावांतील लोकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

पाणी टंचाई घोषित गावे
कऱ्हाड तालुक्यात पाणी टंचाई घोषित करण्यात आलेली ५९ गावे आहेत. त्यामध्ये आरेवाडी, अंतवडी, बामणवाडी, बेलदरे, धावरवाडी, गोळेश्वर, घारेवाडी, कळंत्रेवाडी, किवळ, कुसूर, कोरेगाव, कोळे, खोडशी, खोडजाईवाडी, खालकरवाडी, मेरवेवाडी, नांदलापूर, पेरले, पवारवाडी, पाचुंद, रिसवड, शिंगणवाडी, शिंदेवाडी-विंग, शेरे, शेणोली, टाळगाव, तुळसण, उंडाळे, अंधारवाडी, ओंड, ओंडोशी, बेलवडे बुद्रुक, बानुगडेवाडी, भवानवाडी, चिखली, गायकवाडवाडी, घोलपवाडी, गोसावेवाडी, हरपळवाडी, करंजोशी, कोरिवळे, मनव, मरळी, निगडी, पाडळी-हेळगाव, सावरघर, साळशिरंबे, शहापूर , वाघेरी, येवती, जुजारवाडी, कामथी, शामगाव, भोळेवाडी, डेळेवाडी, कोळेवाडी, मुनावळे, यादववाडी, म्हासोली ही पाणी टंचाई घोषित गावे आहेत.

पाणी टंचाईची दोन तास बैठक
कऱ्हाड तालुक्यातील पाणी टंचाई घोषित गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ, पदाधिकारी यांची येथील पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक पार पडली. दुपारी बारावाजता या बैठकीस प्रारंभ झाला ती दोन वाजता पूर्ण झाली. यावेळी दोन तासांच्या बैठकीत प्रांताधिकारी, तहसीलदार, सभापती यांनी २३ गावांतील पाणी टंचाई, विहिरींची अवस्था, प्रलंबित असलेली कामांवर चर्चा करण्यात आली.

विहिरींची खोली माहिती तरी आहे का ?
पंचायत समितीमध्ये पाणी टंचाईच्या आढावा बैठकीत मांडण्यात आलेल्या विषयांमध्ये जास्त करून विहिरींची खोली वाढविणे व आडवे होल मारणे यांचेच प्रस्ताव घोषित टंचाईग्रस्त गावांमधून आले होते. त्याबाबत संबंधित ग्रामविकास अधिकारी व प्रकल्पाधिकाऱ्यांकडून माहिती दिली जात असताना. तुम्ही प्रत्येक्ष जागेवर जाऊन आला आहात काय? विहिरींची पाहणी केली आहे का? जर पाहणी केली असल्यास त्यांची खोली किती आहे? असे महत्त्वपूर्ण प्रश्न विचारून अधिकाऱ्यांच्या कामांची तपासणी यावेळी उपस्थित प्रांताधिकारी, तहसीलदार, सभापतींकडून करण्यात आली.

विंधनविहिरीसाठी नऊ गावांची निवड
कऱ्हाड तालुक्यातील पाणी टंचाईबाबत सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत विंधनविहिरी व खोलीकरणासाठी नऊ गावांची निवड करण्यात आली. त्यामध्ये पवारवाडी-बामणवाडी, अंतवडी, बेलदरे, खोडशी, पाल-वडगाव रोडवस्ती, रिसवड, शेरे-कॅनॉलवस्ती, वाघेरी, येवती या गावांचा समावेश आहे.
एसीचा रिमोट दादांच्या हातात!
कऱ्हाड पंचायत समितीच्या नवीन वातानुकूलित सभागृहात पाणी टंचाईची आढावा बैठक मंगळवारी पार पडली.यावेळी पाणी टंचाईसारख्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात येत होती. आढावा बैठकीत प्रकल्प अधिकाऱ्यांना उपस्थितांकडून चांगलेच धारेवर धरले जात असताना. सभागृहातील वातानुकूलित यंत्रातील प्रमाण कमी करण्याचे काम रिमोटद्वारे सभापती देवराज पाटील करत होते.

Web Title: Leave the water of the tank in the Mervewadi lake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.