जाणा ‘तिची’ कुचंबणा!
By Admin | Updated: October 12, 2015 00:30 IST2015-10-11T22:03:45+5:302015-10-12T00:30:52+5:30
विद्या बाळ : ‘राइट टू पी’ चळवळीच्या अनुषंगाने महिला प्रसाधनगृहांबाबत सातारकरांना आवाहन--लोकमत संवाद

जाणा ‘तिची’ कुचंबणा!
राजीव मुळ्ये - सातारा -कुटुंबीयांसमवेत शहरातून फेरफटका मारताना पुरुषाला निसर्गाने तातडीची हाक दिली, तर अनेक पर्याय उपलब्ध असतात; परंतु हीच वेळ स्त्रीवर आली तर तिची प्रचंड कुचंबणा होते. महिन्यातील अवघड दिवसांमध्ये तर तिची स्थिती खूपच केविलवाणी होते. पुरुषांची जवळजवळ सगळी कामं आज स्त्री करते आहे. परंतु कामाच्या ठिकाणी, जवळपास तिला प्रसाधनगृह मात्र उपलब्ध नाही. प्रश्न सोडवण्यात अडथळे असतील; पण स्त्रीची कुचंबणा किमान जाणून घेण्यास सगळेच बांधील आहेत.हे कळकळीचे शब्द आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे. एका कार्यक्रमासाठी साताऱ्यात आलेल्या बाळ यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. ‘राइट टू पी’ अर्थात ‘प्रसाधनगृहे असण्याचा स्त्रीचा हक्क’ या आपल्या चळवळीविषयी विस्तृत माहिती देतानाच सात़ाऱ्यासारख्या छोट्या शहरात पालिका, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागातून स्त्रीची ही कुचंबणा कशी थांबविता येईल, याविषयी त्यांनी अनुभवाचे बोल सांगितले. ‘निसर्गाच्या हाकेला वेळीच प्रतिसाद न दिल्यास शरीराला तशी सवयच जडते. जवळपास प्रसाधनगृह नाही म्हणून स्त्री पाणी कमी पिते. तिचे शरीर पुरुषापेक्षा कितीतरी गुंतागुंतीचे असते. या सक्तीच्या कुचंबणेतून स्त्रीला विविध आजार जडतात. महिन्यातील अवघड दिवसांत तर केवळ प्रसाधनगृह उपलब्ध नसल्यामुळे तिचा खूपच कोंडमारा होत असतो. त्या दिवसांत काळजी न घेतल्याचे गंभीर दुष्परिणाम तिला भोगावे लागतात. यासाठीची लढाई अद्याप दूर आहे; पण सातारकरांनी किमान या गोष्टी जाणून घ्याव्यात,’ असे म्हणत त्यांनी जाणीवजागृती, लोकसहभागावर अधिक भर दिला.
‘साताऱ्यासारख्या शहरात वर्दळीची, गर्दीची ठिकाणे, बाजाराची ठिकाणे आणि विविध कारणांनी महिलांचा अधिक वावर असणाऱ्या ठिकाणांचा शोध घेतला गेला पाहिजे. त्यांच्यासाठी सध्या उपलब्ध असलेली प्रसाधनगृहे, त्यांची स्थिती, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे पालिकेने स्वयंसेवी संस्थांमार्फत सर्वेक्षण केलं पाहिजे. महिलांना सुरक्षित आणि दडपणमुक्त वाटेल अशी प्रसाधनगृहांची ठिकाणे आणि रचना असायला हवी. दारे खिडक्या सुस्थितीत असाव्यात, खिडक्यांना काचा नसाव्यात,’ अशा सूचना बाळ यांनी केल्या. या प्रश्नावर २०११ मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सर्वेक्षण मागविले, तेव्हा चुकीची माहिती देण्यात आली. प्रक्रिया वाढत गेल्याने आजअखेर फारसे हाती लागू शकलेले
नाही.
परंतु ‘पुणे पॅटर्न’ दहा शहरांमध्ये राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
या पॅटर्नमध्ये स्वयंसेवी संस्थांनी केलेले वस्तुनिष्ठ सर्वेक्षण हाच महत्त्वाचा भाग असून, साताऱ्यात त्याचे अनुकरण होण्याची अपेक्षा बाळ यांनी व्यक्त केली.
हे नाटक एकदा पाहाच!
प्रसाधनगृहाअभावी महिलेची होणारी गैरसोय हा वरवर पाहता फारसा महत्त्वाचा प्रश्न वाटणार नाही; परंतु तो किती गंभीर आहे, हे सुनीती सु. र. यांच्या कन्या ओजस यांनी नाट्यबद्ध केले आहे. केवळ तीन मैत्रिणींनी ‘बालगंधर्व’मध्ये सादर केलेल्या या नाटकाचा प्रयोग पाहून अनेकांचे डोळे उघडल्याची आठवण विद्या बाळ यांनी सांगितली. साताऱ्यात आवर्जून हा नाट्यप्रयोग आयोजित करावा, असे त्या म्हणाल्या.
सर्व शाळांचे सर्वेक्षण. शिक्षिका आणि मुलींसाठीच्या प्रसाधनगृहांची माहिती
मुख्य रस्त्यांचे सर्वेक्षण. बाजारपेठांमध्ये महिला प्रसाधनगृहांसाठी जागांचा शोध
प्रसाधनगृहापासून आपण किती अंतरावर आहोत, याची माहिती देणारे फलक
गजबजलेल्या भागांत नवीन बांधकामांना परवानगी देताना प्रसाधनगृहाची उभारणी करण्याची अट
पालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलांमध्ये एक गाळा महिला प्रसाधनगृहासाठी राखीव
महिला प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि सुरक्षेसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नियुक्ती
पालिका आणि स्वयंसेवी संस्थांची मोट बांधण्यासाठी महिला
लोकप्रतिनिधींचा पुढाकार